खासदार धनंजय महाडिक यांचे जल्लोषी स्वागत | पुढारी

खासदार धनंजय महाडिक यांचे जल्लोषी स्वागत

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : चुरशीच्या लढतीत राज्यसभेवरील विजयानंतर भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांचे रविवारी कोल्हापुरात जल्लोषी स्वागत करण्यात आले. महाडिक यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची शहरातून विजयी मिरवणूक काढण्यात आली.

भाजपने महाडिक यांच्या स्वागताची ताराराणी चौकात जय्यत तयारी केली. गुलालाची उधळण करून साऊंड सिस्टीमच्या तालावर थिरकलेल्या तरुणाईने ताराराणी चौक गुलालाच्या उधळणीने गुलाबी केला. चौकाला जत्रेचे स्वरूप आले होते.

सायंकाळी पाचच्या सुमारास माजी आमदार महादेवराव महाडिक, धनंजय महाडिक यांचे कुटुंबीयही चौकात आले. त्या पाठोपाठ चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक, आ. प्रकाश आवाडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, शहराध्यक्ष राहुल चिकोडे व भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आले.

त्यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. महापलिकेच्या क्रेनच्या बकेटमध्ये उभे राहून चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक, प्रकाश आवाडे यांनी उपस्थितांना अभिवादन केले. त्यावेळी एक टन वजनाचा प्रचंड मोठा हार क्रेनच्या सहाय्याने महाडिक, पाटील, आवाडे यांना घालण्यात आला.
मिरवणुकीत जीपवर धनंजय महाडिक, चंद्रकांत पाटील, प्रकाश आवाडे, समरजितसिंह घाटगे, राहुल चिकोडे उपस्थितांना अभिवादन करीत होते.

पाटील, महाडिक यांनी ताल धरला

ताराराणी चौकात धनंजय महाडिक, चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव गाडीतच ताल धरला. झांजपथक, ढोल-ताशा पथकाची वाहने, शेकडो दुचाकी, चारचाकी अशी भव्य रॅली काढण्यात आली.

ताराराणी चौक, दाभोळकर कॉर्नर, व्हीनस कॉर्नर, दसरा चौक, आईसाहेब महाराज चौक, बिंदू चौक, शिवाजी चौक मार्गावर मिरवणूक काढण्यात आली.

चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक, सौ. अरुंधती महाडिक, विश्वराज महाडिक, कृष्णराज महाडिक, पृथ्वीराज महाडिक यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर आभार मानून धनंजय महाडिक यांनी रॅली संपल्याचे जाहीर केले. यावेळी माजी आमदार अमल महाडिक, सत्यजित कदम, सुनील कदम, माजी नगरसेवक किरण नकाते, विजय जाधव, अशोक देसाई आदी सहभागी झाले होते.

चौकाचौकांत घुमला शड्डू

कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून धनंजय महाडिक यांनी रॅली मार्गावर चौकाचौकांत ठोकलेला शड्डू चर्चेचा विषय ठरला. तसेच शिवाजी चौकात चांदीची गदा फिरविली. महाडिक यांच्या स्वागतासाठी तब्बल एक टन वजनाचा भव्य हार लक्षवेधी ठरला. मिरवणुकीत पेपर मशिनच्या सहाय्याने गुलालाची उधळण करण्यात आली. मिरवणूक मार्गावर महाडिक यांच्या समर्थकांनी स्वागत करून फटाक्यांची आतषबाजी केली.

Back to top button