कोल्हापूर झेडपीत पुन्हा घमासान होणार! | पुढारी

कोल्हापूर झेडपीत पुन्हा घमासान होणार!

कोल्हापूर ; विकास कांबळे : जिल्ह्यामध्ये एकही आमदार आणि खासदार नसल्याने भाजपच्या नशिबी आलेली राजकीय दुष्काळी परिस्थिती धनंजय महाडिक यांच्या विजयाने थोडीशी दूर होण्यास मदत झाली आहे. याचा परिणाम जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीवर होणार आहे. पावसाळ्यानंतर होणार्‍या जिल्हा परिषद अर्थात ‘मिनी मंत्रालया’च्या निवडणुकीतील चुरस आता वाढणार हे स्पष्ट आहे.

कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो; परंतु मोदी लाटेत हा जिल्हा भुईसपाट झाला होता. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीने आपला गड राखण्यात यश मिळविले. भाजपला मात्र आपली एकही जागा राखता आली नाही. शिवसेनेचे सहा आमदार होते. त्यांनाही केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. राज्यात महायुतीची सत्ता असताना भाजपने ग्रामीण भागात कमळ फुलविण्यास सुरुवात केली होती. यामध्ये त्यांना चांगले यशही आले. पक्षाबरोबर महाडिक गटाची ताकदही याला कारणीभूत ठरली.

2017 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने कोल्हापूर जिल्हा परिषदेवर आपला झेंडा प्रथमच फडकविला होता. या निवडणुकीत भाजपचे काँग्रेसबरोबरच 14 सदस्य निवडून आले. तत्कालीन पालकमंत्री आ. चंद्रकांत पाटील यांनी सर्वांना सोबत घेऊन मोट बांधली आणि काँग्रेसकडून सत्ता हिसकावून घेतली; परंतु तीन वर्षानंतर त्यांना ही सत्ता राखता आली नाही. जिल्ह्यातील दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी शिवसेनेला सोबत घेऊन राज्यातील महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जिल्हा परिषदेत राबवत भाजपकडून सत्ता हिसकावून घेतली.

गेल्या तीन वर्षांपासून कोणतीही सत्ता नसताना किंवा एकही आमदार, खासदार नसताना भाजप जिल्ह्यात काम करत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात महाडिक गटाचे कार्यकर्ते कमी-अधिक प्रमाणात आहेत. राज्यसभेतील विजयामुळे भाजपसह महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लढविण्यासाठी आता भाजपच्या कार्यकर्त्यांना बळ मिळणार आहे.

Back to top button