फुटबॉल हंगामाला ‘हुल्लडबाजी’चे गालबोट! | पुढारी

फुटबॉल हंगामाला ‘हुल्लडबाजी’चे गालबोट!

कोल्हापूर : सागर यादव दोन वर्षे कोरोनामुळे, तर त्यापूर्वी दोन वर्षे हुल्लडबाजीमुळे बंद असणारा फुटबॉल हंगाम पोलिस प्रशासनाच्या हातापाया पडून यंदा कसाबसा सुरू करण्यात आला. मात्र, नेहमीप्रमाणेच यंदाचा फुटबॉल हंगामही खेळापेक्षा हुल्लडबाजीनेच अधिक गाजला. मैदानात गुटखा-माव्याच्या पिचकार्‍या व मुत्राने भरलेल्या बाटल्या फेकण्याचा गलिच्छ प्रकार, खेळाडूच्या घरात जाऊन धमकावण्याची दादागिरी, महिला-मुलींच्या समोर आणि पोलिसांच्या साक्षीने अश्लील हावभाव व शिव्या देणे अशा प्रकारची परिसीमा गाठणारी हुल्लडबाजी पाहण्याची वेळ फुटबॉलप्रेमींवर आली आहे.

खिलाडूवृत्तीचा विसर; सोशल मीडियामुळे खतपाणी, कठोर उपाय-योजनांची गरज

सोशल मीडियासह खेळाडू-संघ व्यवस्थापक-प्रशिक्षक यांच्या कडूनही हुल्लडबाजीला खतपाणी घालण्याचा प्रकार पाहायला मिळाला. खेळाच्या मैदानावरील हुल्लडबाजीमुळे खिलाडूवृत्ती पायदळी तुडविली गेली. भविष्यात हुल्लडबाजी रोखण्यासाठी फुटबॉल संदर्भातील प्रत्येक घटकांकडून कठोर उपाय-योजना करण्यात याव्यात, अशी मागणी फुटबॉलप्रेमींमधून होत आहे.

आचारसंहिता कागदोपत्रीच…

2019-20 च्या फुटबॉल हंगामात झालेल्या हुल्लडबाजी व दगडफेकीत पोलिसांसह अनेकजण जखमी झाले होते, तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांची मोडतोड व सार्वजनिक मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले होते. यामुळे सुमारे दोन महिने फुटबॉल हंगामावर ‘केएसए’ने बंदी घातली होती. खेळाडूंच्या करिअरचा विचार करून आणि पोलिस प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘केएसए’ कडून कडक आचारसंहितेसह फुटबॉल हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

अचारसंहितेनुसार मैदानावर डॉल्बी सिस्टिम व फटाके लावणे, गुटखा-मावा-दारू व तत्सम व्यसन करून प्रवेश, राजकीय नेते, धार्मिक व राष्ट्रपुरुषांचे पुतळे किंवा छायाचित्रे लावणे या गोष्टींवर बंदी घातली होती. उद्घाटन व बक्षीस समारंभावेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी हे कार्यक्रम कमी वेळेत आटोपते घेणे, मोठे स्टेज, लाईट-साऊंड सिस्टिम, आतषबाजी अशा गोष्टींवरही मर्यादा आणल्या होत्या. हुल्लडबाजीची सर्वस्वी जबाबदारी संयोजकांवर सोपवून प्रत्येक सामन्याचे सिसीटीव्ही फुटेज देणे, प्रत्येक सामन्यांना पोलिस बंदोबस्त असणे, प्रत्येक तालीम -मंडळातील 10 जबाबदार प्रतिनिधींना त्या-त्या समर्थकांत बसविणे बंधनकारक करण्यात आले होते. याशिवाय नाहक ईर्ष्या निर्माण होऊ नये, यासाठी बक्षिसांच्या रकमेवरही मर्यादा आणली होती. हाय व्होल्टेज सामने विनाप्रेक्षक घेण्याचाही निर्णय ‘केएसए’कडून घेण्यात आला होता; मात्र ‘केएसए’ची ही अचारसंहिता कागदोपत्रीच असल्याचे वास्तव आहे.

हंगामात अचारसंहितेचा वेळोवेळी भंग

यंदाच्या हंगामात केएसएच्या अचारसंहितेचा भंग बहुतांश स्पर्धांवेळी झाला. बक्षिसांच्या रकमेला मर्यादा असताना ईर्ष्येने बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला. एका-एका गोलसाठी खेळाडूंवर हजारो रुपयांची नाहक उधळण करण्यात आली. डॉल्बीचा दणदणाट सुरूच राहिला. बक्षीस समारंभावेळी मैदानात लाखो रुपये खर्चून इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून स्टेज, आतषबाजी असे प्रकार झाले. यामुळे समर्थकांत नाहक ईर्ष्या वाढली.

मैदानात ध्वज, फटाके, पाण्याच्या बाटल्या अशा गोष्टी नेण्यावर बंदी असतानाही पोलिसांच्या उपस्थितीतच या गोष्टींचा गैरवापर मैदानात झाला. इतकेच नव्हे, तर राजर्षी शाहू चषक स्पर्धेवेळी एका हुल्लडबाजाकडे चक्क चाकू सापडला. मैदानात खेळाडू, पंच, संघांचे ऑफिस सोडून कोणीही जाऊ नये, असा नियम असतानाही प्रत्येक स्पर्धेवेळी मैदानात मोठी गर्दी होत राहिली. सोशल मीडियासाठीही विविध सूचना व नियम लागू करण्यात आले होते. याकडे दुर्लक्ष करून सोशल मीडियावरही समर्थकांच्या हुल्लडबाजीने परिसीमा गाठली होती. यामुळे यंदाच्या हंगामातही खेळापेक्षा हुल्लडबाजीच वाढल्याचे दिसले.

Back to top button