शासकीय कर्मचार्‍यांचा ‘फिटनेस’ तपासणार | पुढारी

शासकीय कर्मचार्‍यांचा ‘फिटनेस’ तपासणार

कोल्हापूर ; अनिल देशमुख : शासकीय कर्मचार्‍यांची शारीरिक क्षमता तसेच प्रकृतिमान योग्य नसल्यास त्याचा कामकाजावर परिणाम होत आहे. यामुळे कर्मचार्‍यांचा आता ‘फिटनेस’ तपासला जाणार आहे. त्याची जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू झाली आहे. या निर्णयानुसार कर्मचार्‍यांच्या कॅन्सर, फुफ्फुस, किडनी, हृदय आदींसह विविध 70 तपासण्या केल्या जाणार आहेत.

40 वर्षांवरील कर्मचार्‍यांसाठी दोन वर्षांतून एकदा तर 50 वर्षांवरील कर्मचार्‍यांना दरवर्षी या वैद्यकीय चाचण्या कराव्या लागणार आहेत. याकरिता कर्मचार्‍यांना पाच हजार रुपयांपर्यंत परिपूर्तीही केली जाणार आहे. तपासणीच्या या निर्णयाला कर्मचारी संघटनेने मात्र विरोध केला आहे.

शासकीय कामकाजाचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत चालले आहे. यामुळे शासकीय कर्मचार्‍यांच्या दैनंदिन कार्यपद्धतीवरही परिणाम होत आहे. त्यातून वाढत्या ताणतणावामुळे, धावपळीमुळे कर्मचार्‍यांच्या प्रकृतीवरही परिणाम होताता दिसत आहे. अकाली मृत्यू, आजारपणाचे प्रमाण वाढत आहे. या सर्वांचा शासकीय कामावरही परिणाम होत आहे. परिणामी त्याचा सर्वसामान्य नागरिकांनाही फटका बसत आहे.

कर्मचार्‍यांच्या ‘सीआर’ (कार्यमूल्यमापन अहवाल) मध्ये प्रकृतिमानाबाबत उत्कृष्ट, चांगला, चांगले नाही अशी वर्गवारी असते. याबाबतचा शेरा देण्यासाठी कर्मचार्‍याचा वैद्यकीय अहवाल उपलब्ध असल्यास योग्य शेरा देता येणे शक्य होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शासकीय कर्मचार्‍यांची वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या चाचण्यांसाठी एक दिवसाची पगारी सुट्टीही दिली जाणार आहे.

Back to top button