पूरग्रस्तांसाठी निवारा उभारणार | पुढारी

पूरग्रस्तांसाठी निवारा उभारणार

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : पूरग्रस्तांसाठी नाम फाऊंडेशनच्या वतीने निवारा उभारण्यात येत असल्याचे प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी शुक्रवारी सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यातही पूरग्रस्तांनाही अशी घरे देण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत सायंकाळी त्यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेऊन तासभर चर्चा केली.

शिरोळ तालुक्यात पूरग्रस्तांसाठी कायमस्वरूपी, पक्की घरे बांधण्यात येणार आहेत. जागेच्या प्रश्नाबाबत पाटेकर यांनी जिल्हाधिकार्‍यांशी त्यांच्या दालनात चर्चा केली. जागेचा प्रश्न सुटेपर्यंत कम्युनिटी सेंटर उभे करता येईल, असेही त्यांनी सांगितले. या सर्व प्रश्नांबाबत शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशीही चर्चा करू, असेही त्यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यात फाऊंडेशनच्या वतीने गावोगावी शोषखड्डे काढल्याचे पाटेकर यांनी सांगितले. त्यावर कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीकाठावरील गावांतील प्रदूषण रोखण्यासाठी तिथेही शोषखड्डे काढले जात आहेत. यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केली. त्यावर पाटेकर यांनी तत्काळ त्याला होकार दिला. यावेळी इंद्रजित देशमुख, पाटेकर यांचे चिरंजीव मल्हार पाटेकर उपस्थित होते.

आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत, ज्या आपल्या अपेक्षा आहेत, त्यासाठी भांडायला हवेच, असे सांगत आपल्याला मतांचा अधिकार आहे. आपण मत देतो; पण त्यातून कोण सत्ताधारी बनतो, तर कोण विरोधक होतो. म्हणून आपले काम सोडायचे नाही, असेही पाटेकर म्हणाले.
असा कलेक्टर मिळेल काय रे!

जिल्हाधिकार्‍यांच्या कामाचे कौतुक करताना नाना पाटेकर यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात बसलेल्या सर्वसामान्य नागरिकांशीही संवाद साधला. काय रे, असा कलेक्टर तुम्हाला कधी मिळेल का, अशी माणस जपली पाहिजेत, त्यांच्या कामाला सलामच आहे, असेही त्यांनी
सांगितले.

हसन माझा जवळचा दोस्तच!

कागलमध्ये शनिवारी होणार्‍या पुतळे अनावरण कार्यक्रमासाठी नाना आज कोल्हापुरात दाखल झाले. ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांनी त्यांची हॉटेलमध्ये जाऊन भेट घेतली. मुश्रीफ भेटण्यासाठी येत असल्याचे समजताच दस्तूरखुद्द नानाच त्यांच्या स्वागतासाठी खोलीच्या बाहेर लॉबीत येऊन उभे होते. मुश्रीफ समोर येताच नानांनी त्यांना मिठी मारली.

‘अरे, तू इकडे कशाला आलास? मीच तुला भेटण्यासाठी तुझ्याकडे येणार होतो,’ असे नाना यांनी सांगताच मुश्रीफ म्हणाले, ‘असं नाही… पाहुण्यांचं स्वागत व आदरातिथ्य करणं ही आमची कोल्हापूरची संस्कृती आहे. यावेळी मुश्रीफ यांचा नानांनी एकेरी उल्लेख केला. त्यावेळी उपस्थित थबकले. त्यावर नाना म्हणाले, ‘हसन माझा जवळचा दोस्त आहे रे… गैरसमज करून घेऊ नका. तसेच काही दिवसांपूर्वी मुंबईत रस्त्यातून जातानाच मला हसन दिसला. मी हसन…. हसन… म्हणत.. म्हणत गाडी दुसर्‍याला धडकली’, असा किस्साही नानांनी यावेळी सांगितला.

Back to top button