कोल्हापूर : कुरुंदवाडचे गणपती बाप्पा निघाले जर्मनीला | पुढारी

कोल्हापूर : कुरुंदवाडचे गणपती बाप्पा निघाले जर्मनीला

कुरुंदवाड; जमीर पठाण : कुरुंदवाड येथील गणेशमूर्तीकार बाबासो कुंभार यांच्याकडील गणेशमूर्ती (गणपती बाप्पा) जर्मनीत प्रतिष्ठापनेसाठी रवाना झाले आहेत.

नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने परदेशात स्थायिक झालेले मराठीजन गणेशोत्सव खूपच उत्साहाने साजरा करतात. सध्या कोरोना संकट शिथिल झाल्याने विघ्नहर्ता गणपती बाप्पाची परदेशवारी अर्थात सातासमुद्रापारचा प्रवास सुरू झाला आहे.

कुरुंदवाड येथील गणेशमूर्तीकार बाबासो कुंभार यांच्याकडील शाडू मातीची महागणपतीची गणेशमूर्ती जर्मनी या देशात प्रतिष्ठापनेसाठी रवाना झाल्याचे मूर्तीकाराने सांगितले आहे.

कोरोनाचा विषाणूचा संसर्ग कमी झाला आहे. मात्र, पूर्णपणे संपलेला नाही. त्यात तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात येत असल्याने गतवर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाचे सावट असल्याने गणेशमूर्तीकार कुंभारांना मोठा फटका बसला आहे.

अशा परिस्थितीत नाराज झालेला गणेशमूर्तीकार बाबासो कुंभार यांनी तयार केलेली महागणपतीची एक फुटी गणेशमूर्ती जर्मनीला रवाना होणार आहे. त्यामुळे कुरुंदवाड गावचे नावलौकिक झाले आहे. कुरुंदवाडचे गणपती बाप्पा आता परदेशात जात असल्याचा आनंद द्विगुणित झाला आहे.

अनिल वसंत खोत यांनी दिली ऑर्डर

शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथील अनिल वसंत खोत हे जर्मनी येथील पोक्स व्हगण कंपनीत सेवेत आहेत. त्यांनी येथील बाबासो कुंभार यांच्याकडे महागणपती मूर्ती बनवण्यासाठी ऑर्डर दिली होती. या ऑर्डरप्रमाणे गणेशमूर्ती तयार करून जर्मनीस रवाना होत आहे.

जर्मनीत स्थायिक असलेले अनिल खोत यांच्या पत्नी अनिता खोत याचे माहेर कुरुंदवाड (भैरववाडी) हे असून सध्या त्या शिरोळ येथे आहेत. आज शुक्रवारी (दि.१३) रोजी येथील गणेश मूर्ती थर्माकॉलच्या बॉक्समध्ये पॅकींग करून पुणे येथुन दिल्लीला रवाना झाली आहे. तसेच पुढे दिल्लीतून जर्मनी असा १४ तासाचा प्रवास करत गणपती बाप्पा जर्मनीला पोहोचणार आहोत.

आपण निर्माण केलेली गणेशमुर्ती जर्मनीला जात असल्याचा आनंद मूर्तीकार बाबासो कुंभार व परिवाराला झाला आहे.

हेही वाचलंत का? 

पाहा : कणखर सह्याद्रीत दरडी का कोसळत आहेत?

Back to top button