कोल्हापूर मध्ये ११५ दिवसांनी सुरू होणार सर्व दुकाने | पुढारी

कोल्हापूर मध्ये ११५ दिवसांनी सुरू होणार सर्व दुकाने

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाने जिल्ह्यातील सर्व दुकाने रात्री दहापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व दुकाने 115 दिवसांनंतर सुरू होणार आहेत. या निर्णयामुळे व्यापार्‍यांना आनंदाचे भरते आले असून, संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

राज्यात अन्य जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल होत असताना कोल्हापूर जिल्हा मात्र त्याला अपवाद होता. कोरोना पॉझिटिव्हिटी रेट जास्त असल्याने कोल्हापुरात तीन महिन्यांपूर्वी केवळ अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू होती. नंतर कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी आल्याने जिल्ह्याचा समावेश तिसर्‍या टप्प्यात करण्यात आला.

त्यानंतर आरटी-पीसीआर रेट दहाच्या आत येऊनही दुकाने सुरू करण्यास परवानगी न मिळाल्याने व्यापार्‍यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. त्यानंतर राज्य सरकारने एक आठवडा शहर व जिल्हा अशी विभागणी केल्यानंतर आठ दिवसांसाठी शहरातील सर्व दुकाने सुरू झाली; पण नंतर शासनाने पुन्हा यावर बंदी आणली.

पॉझिटिव्हिटी रेट दहाच्या आत आल्यानंतर शासनाने सर्व दुकाने सकाळी 7 ते दुपारी 4 या वेळेत सुरू केली. सध्या आरटी-पीसीआर रेट हा पाचच्या आत आल्याने दुकानांची वेळ सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत वाढवून देण्याची मागणी केली होती. यासाठी महाद्वार रोड व्यापारी असोसिएशनने घंटानाद आंदोलनाचा इशाराही दिला होता. आंदोलनही सुरू होते; पण शासन निर्णयाने हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

5 एप्रिलपासून दुकाने होती बंद

कोरोनाचा संसर्ग वाढू लागला तसे शासनाने 5 एप्रिल 2021 रोजी आदेश काढून केवळ अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू करण्याला परवानगी दिली होती. रात्री दहापर्यंत पूर्ववत दुकाने सुरू करण्याच्या आदेशाची 115 दिवस व्यापारीवर्गाला प्रतीक्षा करावी लागली. या शासन निर्णयाचे स्वागत असून, प्रत्यक्ष निर्णय काय आहे, याची प्रतीक्षा असल्याचे चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले. तर महाराष्ट्रातील व्यापार्‍यांना दिलासा देणारा हा निर्णय असल्याचे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष ललित गांधी म्हणाले.

हॉटेल व्यवसायाला मिळणार ऊर्जितावस्था : लाटकर

24 मार्च 2021 पासून कोल्हापूर जिल्ह्यातील हॉटेल व्यवसाय बंद होता. अनेक कामगारांना या बंद काळातही पगार दिले गेले. अन्य व्यवसाय सुरू होते; पण हॉटेल व्यवसाय बंद राहिल्याने पर्यटनाचा हंगामही वाया गेला. हॉटेल रात्री दहापर्यंत सुरू ठेवण्याबरोबरच लग्‍न समारंभासाठी नागरिकांच्या उपस्थितीची मर्यादाही वाढवल्याने या व्यवसायाला ऊर्जितावस्था मिळाल्याचे कोल्हापूर जिल्हा हॉटेल मालक संघाचे सचिव सिद्धार्थ लाटकर यांनी सांगितले.

Back to top button