सीपीआरमधील डॉक्टर पुन्हा सिंधुदुर्गला प्रतिनियुक्तीवर | पुढारी

सीपीआरमधील डॉक्टर पुन्हा सिंधुदुर्गला प्रतिनियुक्तीवर

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा :  राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शेंडा पार्क कोल्हापूर येथील पाच डॉक्टर प्राध्यापकांना पुन्हा सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हजर होण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे एम.बी.बी.एस. प्रथम वर्षात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच सीपीआरमधील रुग्णसेवेवर परिणाम होणार आहे.

सिंधुदुर्ग येथे नव्याने उभारण्यात आलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तपासणीसाठी सुमारे 35 डॉक्टरांसह अन्य कर्मचार्‍यांना प्रतिनियुक्तीवर पाठविले होते. गेली वर्षभर प्राध्यापक डॉक्टर, कर्मचारी यांच्या कोल्हापूर-सिंधुदुर्ग फेर्‍या सुरू होत्या. त्यामुळे सीपीआर येथील रुग्णसेवा वारंवार विस्कळीत झाली आहे. शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या या कारभाराबाबत तीव— नाराजी होती. रुग्णांसह वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ लागल्याने सामाजिक संघटनांनी आंदोलन उभा केल्यानंतर पुन्हा त्या डॉक्टरांना सिंधुदूर्ग येथून कार्यमुक्त केले होते. रुग्णांच्या रखडलेल्या शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचा पाठिमागे राहिलेला अभ्यास परीक्षेपूर्वी प्राध्यापकांनी पूर्ण करून घेतला. आता पुन्हा प्राध्यापक डॉक्टरांना सिंधुदुर्गला बोलावणे आले आहे.

दोन महिन्यांपूर्वीच सिंधुदुर्ग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले आहे. सध्या येथे एम.बी.बी.एस. प्रथम वर्षाचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना शिकविण्यासाठी येथे प्राध्यापकच नाहीत. त्यामुळे येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पाच शिक्षकांना प्रतिनियुक्तीवर त्वरित हजर होण्यासाठी कार्यमुक्त करावे असे परिपत्रक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्गचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी काढले आहे. त्यामुळे येथे प्रथम वर्षाचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची शिक्षणा अभावी गोची होणार आहे. विद्यार्थ्यांच्या होणार्‍या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार कोण असा संतप्त प्रश्न विद्यार्थ्यांमधून उपस्थित होत आहे.

विद्यार्थ्यांची शिकवणी बंद

शरीररचना शास्त्र, शरीरक्रिया शास्त्र, जीवरसायन शास्त्र विभागातील प्राध्यापक डॉक्टरांचा यामध्ये समावेश आहे. जीवरसायन शास्त्र विभागत फक्त दोन प्राध्यापक आहे. त्या दोघांना सिंधुदुर्गला पाठविल्यामुळे विद्यार्थ्यांची शिकवणी बंद झाली आहे. तर शरीरक्रिया शास्त्र भागातील 4 पैकी 2 तर शरीररचना शास्त्र विभागातील 3 पैकी 1 प्राध्यापकांचा यामध्ये समावेश आहे.

Back to top button