कोल्हापूर : दिवसभरात साडेअकरा टन आंब्यांची विक्री | पुढारी

कोल्हापूर : दिवसभरात साडेअकरा टन आंब्यांची विक्री

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व अंतर्गत शाहू मिल येथे सुरू असलेल्या आंबा जत्रेत तिसर्‍या दिवशी तब्बल साडेअकरा मेट्रिक टन आंबा विक्री झाली. यातून उत्पादकांना 11 लाख 40 हजार रुपये प्राप्त झाले. आंबा खरेदीसाठी ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रविवारी (दि.22) हा आंबा यात्रेचा शेवटचा दिवस आहे.

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त उत्पादक ते ग्राहक थेट विक्री अंतर्गत ‘जत्रा आंब्याची’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या आंबा जत्रेत हापूस, पायरी, तोतापुरी, कोकण सम्राटसह विविध प्रजातींचे आंबे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. याठिकाणी 18 उत्पादकांचे 18 स्टॉल लावण्यात आले होते. त्यात शनिवारी रत्नागिरी, सोलापूरसह अन्य भागातून चार शेतकरी सहभागी झाले. या शेतकर्‍यांसाठी 4 स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे स्टॉलधारकांची संख्या आता 24 झाली आहे. शनिवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे आंबा खरेदी करण्यासाठी ग्राहकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. शनिवारी दिवसभरात साडेअकरा टन आंबा विक्री झाली. यात्रेच्या तीन दिवसांत 22 टन आंबा विक्री झाली आहे. तर तीन दिवसांत 22 लाख 20 हजारांची उलाढाल झाली, असे पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी सांगितले.

Back to top button