राधानगरीत सुसज्ज ग्रंथालय, संशोधन केंद्र स्थापन करू : मंत्री सामंत | पुढारी

राधानगरीत सुसज्ज ग्रंथालय, संशोधन केंद्र स्थापन करू : मंत्री सामंत

राधानगरी; पुढारी वृत्तसेवा : राधानगरीच्या पर्यटन विकासासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे सकारात्मक असून, राजर्षी शाहू महाराज पुढच्या पिढीला कळावेत, यासाठी धरणस्थळावरील वीजगृहाच्या इमारतीत त्यांच्या कार्याची थोरवी गाणारे सुसज्ज ग्रंथालय व संशोधन केंद्र लवकरच स्थापन करू, अशी ग्वाही उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रविवारी दिली. यावेळी मंत्री सामंत यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले.

कोल्हापूर जिल्ह्याच्या हरितक्रांतीचे प्रणेते, बहुजन उद्धारक, सामाजिक क्रांतीचे प्रवर्तक, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती जतन करण्यासाठी आ. प्रकाश आबिटकर व गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांच्या अथक प्रयत्नातून राधानगरी धरण पायथ्याशी उभारलेल्या शाहू स्मृती केंद्राचा उद्घाटन समारंभ व कृतज्ञता सोहळा रविवारी पार पडला. यावेळी सामंत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी शाहू महाराज होते. यावेळी मालोजीराजे उपस्थित होते.

मंत्री सामंत म्हणाले, शंभरहून अधिक वर्षे टिकणारी धरणे निर्माण करायची झाली तर राधानगरी धरणाच्या उभारणीचा सर्वंकष अभ्यास झाला पाहिजे. पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, वंचित समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न राजर्षी शाहूंनी केला.कोल्हापूर जिल्ह्याला दिशा देण्याचे काम शाहूंनी केले. त्यांच्या स्मृती जपण्याचे काम आपण करणार आहोत. ज्या भूमीला इतिहास असतो, ती भूमी भूगोल घडवत असते. राधानगरी धरण स्थळावरील राजर्षी शाहूंचे स्मृती केंद्र येणार्‍या पिढीला प्रेरणादायी ठरेल. म्हैसूर गार्डनच्या धर्तीवर राधानगरी धरणस्थळाशेजारी गार्डन उभारणीसाठी प्रयत्नशील आहे.

आ. प्रकाश आबिटकर म्हणाले, राधानगरीच्या पर्यटन विकासासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे 110 कोटींचा विकास आराखडा सादर केला असून, त्यातील 25 कोटी मंजूर झाले असून, काम प्रगतिपथावर आहे. राधानगरीच्या पर्यटन विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहोत. खा. संजय मंडलिक, खा. धैर्यशील माने यांनी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही दिली.

शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख विजय देवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील, अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, तहसीलदार मीना निंबाळकर, गटविकास अधिकारी डॉ. संदीप भंडारे, राधानगरी व परिसरातील नागरिक, मंडळांचे कार्यकर्ते, व्यापारी संघटना, महिला बचत गट, सर्व संस्था व ग्रा. पं. पदाधिकारी उपस्थित होते. शाहू स्मारक समितीचे अध्यक्ष अभिजित तायशेटे यांनी केले स्वागत व प्रास्ताविक केले. राधानगरीच्या सरपंच कविता शेट्टी यांनी आभार मानले.

तालुक्यात शाहूमय वातावरण

तालुक्यातून सुमारे 100 शाहू ज्योती कार्यक्रमस्थळी दाखल झाल्या होत्या. त्यांचे मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन निमंत्रक समितीतर्फे स्वागत करण्यात आले. राधानगरी बसस्थानक ते धरणस्थळापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा राधानगरी व फेजिवडे ग्रामपंचायतींच्या वतीने रांगोळी, झेंडे, पताका, स्वागत कमानी उभारल्या होत्या. फेजिवडे ते धरणस्थळ शोभायात्रा काढण्यात आली. तालुक्यातील अनेक शाळांतील विद्यार्थी पदयात्रेत सहभागी झाले होते. राधानगरी ते धरणस्थळापर्यंत मोफत प्रवासाची सोय करण्यात आली होती. रंगमंचस्थळी दिवसभर शिव-शाहूंच्या पोवाड्यांचे आयोजन केले होते. राधानगरी, फेजिवडे येथील मुस्लिम समाजाने सर्व शाहूप्रेमींना मोफत ज्युस व अल्पोपाहाराची सोय केली होती.

Back to top button