‘रेल्वे’कडून कोल्हापूर पुन्हा दुर्लक्षितच! | पुढारी

‘रेल्वे’कडून कोल्हापूर पुन्हा दुर्लक्षितच!

कोल्हापूर; अनिल देशमुख : रेल्वेने कोल्हापूरला नेहमीच वेटिंगवरच ठेवले आहे. कोल्हापूरकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मध्य रेल्वेने यंदाच्या हंगामात सर्वाधिक 626 उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या विविध मार्गांवर सोडल्या आहेत. मात्र,यामध्ये कोल्हापूरचा समावेश नाही. कोल्हापुरातून यंदाच्या हंगामात एकही विशेष रेल्वे धावणार नाही.

मध्य रेल्वेने एप्रिल ते जून या कालावधीत उन्हाळी हंगामात प्रवाशांची होणारी गर्दी आणि वाढती मागणी विचारात घेऊन जादा उन्हाळी विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मध्य रेल्वे मुंबई, पुणे, नागपूर, पनवेल, शिर्डी, लातूर, बिदर आदी ठिकाणांहून 626 जादा गाड्या सोडणार आहे. यासह अन्य विभागांतून या मार्गावर येणार्‍या गाड्यांची संख्या विचारात घेता उन्हाळी हंगामासाठी या स्थानकांवरून एकूण 690 जादा गाड्या धावणार आहेत.

कोल्हापूर हे मध्य रेल्वेचे दक्षिणेकडील अखेरचे स्थानक आहे. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक उत्पन्न देणार्‍या मध्य रेल्वेच्या स्थानकांपैकीही एक आहे. कोल्हापूरचे धार्मिक, पर्यटन, औद्योगिकदृष्ट्या असलेले महत्त्व, कोल्हापूरचे भौगोलिक स्थान पाहता कोल्हापूरचे दळणवळण वाढणे आवश्यक आहे. यामुळे सातत्याने कोल्हापुरातून नव्या मार्गांवर गाड्या सुरू करण्याची मागणी होत असते.

सध्या कोल्हापुरातून अहमदाबाद, दिल्ली आणि धनबाद या आठवड्यातून एकदा धावणार्‍या तीन सुपरफास्ट रेल्वे आहेत. दिल्ली आणि धनबाद या गाड्यांद्वारे उत्तर भारतात जाणार्‍या प्रवाशांची संख्या अधिक आहे. गुजरात, राजस्थानकडे जाणार्‍या प्रवाशांना कोल्हापूर-अहमदाबादचाच आधार आहे. या गाड्यांना नियमित मोठी गर्दी असते, यामुळे किमान सुट्टीच्या कालावधीत तरी अशा मार्गांवर ‘स्पेशल ट्रेन’ सोडण्याची गरज आहे. मात्र, रेल्वेने या उन्हाळी स्पेशल रेल्वे वेळापत्रकात कोल्हापूरचा विचारच केलेला नाही.

उन्हाळी अथवा हिवाळी स्पेशल ट्रेनच्या माध्यमातून नव्या मार्गावर वाहतूक सुरू करण्यासाठी चाचपणी करता येते. त्यातून अशा मार्गावर सुरू केलेल्या स्पेशल ट्रेनना जर पुढे चांगला प्रतिसाद मिळत गेला तर कायमही केल्या जातात. यामुळे अशा स्पेशल ट्रेन सुरू झाल्या तर भविष्यात त्या मार्गावर कोल्हापुरातून ट्रेन सुरू होण्याची शक्यता निर्माण होते. कोल्हापूर-गुवाहाटी मार्गावर तीन महिने विशेष रेल्वे सुरू करण्याचा रेल्वेचा विचार होता. त्यानुसार प्रस्तावही तयार केला होता. मात्र, तोही बारगळला. ही रेल्वे अद्याप सुरू झालेली नाही.

…अशा आहेत उन्हाळी स्पेशल रेल्वे

लोकमान्य टिळक टर्मिनसवरून उत्तर भारतासाठी 306

सीएसटी, मुंबईवरून मनमाड, नागपूर, मालदा, रिवासाठी 218

पुण्यातून करमळी, जयपूर, दानापूर, झांशी, कानपूरसाठी 100

नागपूरमधून मडगावसाठी 20

शिर्डीमधून ढहर का बालाजीसाठी 20

पनवेलमधून करमळीसाठी 18

दादरहून मडगावसाठी 6

लातूरमधून बिदरसाठी 2

Back to top button