विकासाच्या वाटेवरचं कोल्हापूर भकास! | पुढारी

विकासाच्या वाटेवरचं कोल्हापूर भकास!

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आहे.विकासाची आस लागलेल्या कोल्हापूर शहराचे प्रश्न गंभीर होत आहेत. विकासाची जबाबदारी असणारी महापालिका आणि लोकप्रतिनिधींचे निव्वळ ‘मागील पानावरून पुढे’ धोरण असल्याने गेल्या पाच वर्षांत नवे काहीच घडले नाही. या रखडलेल्या प्रश्नांचा वेध घेणारी वृत्तमालिका आजपासून…

अंबाबाईचं कोल्हापूर… महाराणी ताराराणींची राजधानी कोल्हापूर.., राजर्षी शाहू छत्रपतींचे पुरोगामी कोल्हापूर… उद्योगाच्या क्षेत्रात ज्या जिल्ह्यांचे नावही नव्हते, त्या काळापासून उद्योगनगरीचा मुकुट शिरावर अभिमानाने मिरवणारे कोल्हापूर… पण, या कोल्हापूरची आजची अवस्था म्हणजे विकसित न झालेले बकाल शहर अशी झाली आहे. धड चांगले रस्ते नाहीत, रस्त्यांवरून ठिकठिकाणी वाहणारे सांडपाणी, रस्तोरस्ती साचलेले कचर्‍याचे ढीग, वाहतुकीचा खेळखंडोबा, पार्किंगची ऐशी-तैशी, शहराच्या तीन बाजूंनी नदी वाहत असतानाही शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई हे चित्र बदलणार कधी? आणि कोण बदलणार? कोट्यवधींच्या योजनांच्या घोषणा करायच्या, तोंड फाटेपर्यंत विकासाचे चित्र उभा करायचे; पण प्रत्यक्षात कोल्हापूरची बकाल अवस्था बदलण्याचे खरे आव्हान आहे.

राज्यकर्त्यांचा कोल्हापूरवर अन्याय

मुळात राज्यकर्त्यांकडून कोल्हापूरवर अन्याय करण्याची परंपरा कायम राहिली आहे. कोल्हापूरची महापालिका होताना केवळ नगरपालिकेवरील नामफलक बदलण्यात आला. एका इंचाचीही हद्द न वाढता कोल्हापूरची महापालिका करण्यात आली. शेजारी सांगलीची महापालिका करताना सांगली व मिरज या दोन नगरपालिका व कुपवाड ग्रामपंचायतीचे एकत्रिकरण करून महापालिका अस्तित्वात आणण्यात आली. पुणे, सोलापूर या जवळच्या जिल्ह्यांतील महापालिकांची कित्येकदा हद्दवाढ करण्यात आली; पण कोल्हापूरबाबत बोलायचे तर शहरात राहणार्‍या नेत्यांनीच कोल्हापूरच्या हद्दवाढीला ‘खो’ घातला आहे.

थेट पाईपलाईनचे वाकडे वळण!

जे हद्दवाढीचे तेच पिण्याच्या पाण्याचे. कोल्हापूरकरांना अक्षरशः सांडपाणीमिश्रित पाणी प्यावे लागत होते. शहरातील सांडपाणी मिसळल्यानंतर कसबा बावडा येथून पाणी उपसा केला जात होता. जनतेच्या आंदोलनाच्या रेट्यानंतर कोल्हापूर शहराला काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनने पाणी देण्याच्या योजनेची घोषणा करण्यात आली. हे थेट पाईपलाईनचे पाणी यावर्षी अभ्यंगस्नानाला मिळण्याच्या घोषणा महापालिकेची सूत्रे सांभाळणार्‍या नेत्यांनी दिल्या; पण कोणत्या वर्षीच्या दिवाळीचे अभ्यंगस्नान हे न सांगता नेत्यांनी चलाखी केली.

रस्त्यांना अतिक्रमणांचा विळखा

शहरातील रस्ते महापालिकेला आपल्या मालकीचे आहेत, असा दावाही करता येऊ नये असा अतिक्रमणांचा विळखा शहराला पडला आहे. मध्यंतरी हटविलेले अतिक्रमण पुन्हा कसे झाले याचे उत्तर कोण देणार? या अतिक्रमणांना आशीर्वाद कोणाचा? यंत्रणेचे हात कारवाईसाठी कोणी बांधले, याचे उत्तर जनतेला मिळणार की जनतेला किड्या मुंग्यासारखे वागविणार याचे उत्तर द्यायला हवे.

घोषणा करणार्‍यांचाच सुकाळ…

शहरात प्रश्न अनेक आहेत; पण ते सोडविणार्‍या यंत्रणेचा अभाव आहे. घोषणा करणार्‍यांचा सुकाळ आणि प्रश्न सोडविणार्‍यांचा दुष्काळ, यामुळेच कोल्हापूर दिवसेंदिवस बकाल आणि भकास बनत आहे. वेळीच लक्ष दिले नाही तर यातून केवळ सामाजिक प्रश्नच नव्हे तर कायदा आणि सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होणार आहे. यंत्रणांनी या गंभीर प्रश्नांकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे आणि यंत्रणा लक्ष देणार नसतील तर ते त्यांनी द्यावे यासाठी जिल्ह्याचे नेतृत्व करणार्‍यांनी यंत्रणेला तसे करण्यासाठी भाग पाडले पाहिजे.

वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा

शहरातील वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. केएमटीची वाहतूक व्यवस्थाही कोलमडली आहे. शहरात वाहतुकीची कोंडी पाहायला मिळते. शहरातील मंडई म्हणजे घाणीचे आगर बनले आहे; पण त्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही. महापालिका मार्केटमधील अतिक्रमणे पाहिली तर या मार्केटची मालकी महापालिकेची की अन्य कोणाची? असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. कचर्‍यापासून वीज तयार करणारे उपक्रम राज्यात राबविले जात आहेत. कोल्हापुरात जेथे कचरा साठविला जातो, तेथे वावरणार्‍या मोकाट कुत्र्यांनी लहान बाळाचे लचके तोडले तरी मुर्दाड यंत्रणेला जाग येत नाही.

पार्किंगची समस्या गंभीर

अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. शहरात प्रवेश केल्यापासून ते मंदिरापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांना मंदिराचा पत्ता वारंवार विचारावा लागतो. तेथून पार्किंगकडे गेल्यानंतर पार्किंग मिळाले तर ठीक; अन्यथा बिंदू चौक, शिवाजी चौक अशा फेर्‍या सुरू होतात. यामुळे वाहतुकीची कोंडी होते. स्थानिक यंत्रणांना वर्षांनुवर्षे पार्किंगची सोय करायला जमले नाही. गप्पा मात्र तीर्थक्षेत्र विकासाच्या मारायच्या हेच सुरू आहे.

Back to top button