पंचगंगेत मृत माशांचा खच | पुढारी

पंचगंगेत मृत माशांचा खच

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : शिरढोण पुलाजवळ पंचगंगा नदीपात्रात रसायनयुक्त प्रदूषित पाणी मिसळल्याने मासे तडफडून मरत आहेत. रविवारी नदीपात्रात मृत माशांचा खच आढळून आला.

पंचगंगा नदीत प्रदूषित पाणी मिसळल्याचे या वर्षात पाच ते सहावेळा घडले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना तर फटका बसला आहेच; शिवाय ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या शिरढोण पूल ते तेरवाड बंधार्‍यापर्यंत जलपर्णीने नदीपात्र व्यापले आहे. दोन महिन्यांपासून इचलकरंजीला जाणारी कृष्णा पाणी योजनेच्या पाईपलाईनचे काम नदीपात्रात सुरू आहे. यासाठी बांध घालण्यात आला आहे. त्यामुळे पाणी काही प्रमाणात तुंबून राहिले आहे. इचलकरंजी येथील काळ्या ओढ्याचे रासायनिक पाणी येऊन मिळाले आहे. सध्या धरणातून पाणी सोडल्याने काळ्या ओढ्याचे पाणी थेट शिरढोण पुलाजवळ येऊन थांबले आहे.

या प्रदूषित पाण्यामुळे माशांना ऑक्सिजन मिळत नसल्याने मासे तडफडू लागले आहेत. मृत व तडफडणारे मासे विक्रीला नेण्यासाठी एकच गर्दी होत आहे. शिरढोण पूल ते अब्दुललाट पाणवठ्यापर्यंतच्या पंचगंगेवर आधारित गावच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न प्रदूषित पाण्यामुळे गंभीर झाला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाला पंचगंगा शुद्ध करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाला त्यांनी केराची टोपली दाखवल्याचे स्पष्ट झाले आहे.

Back to top button