कोल्हापूर : संस्थेवर परिणाम करणारे वक्तव्य निदान संचालकांनी करू नये ; मंत्री मुश्रीफ | पुढारी

कोल्हापूर : संस्थेवर परिणाम करणारे वक्तव्य निदान संचालकांनी करू नये ; मंत्री मुश्रीफ

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
संस्थेवर परिणाम होईल अशी वक्तव्ये निदान संचालकांनी तरी करू नयेत. राजकारणासाठी काही तरी बोलायचे योग्य नाही. निवडणूक विधानसभेची आणि गाडी चालली ‘गोकुळ’ला असला हा प्रकार असल्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. दुधाच्या दर्जाविषयी किंवा प्रतीविषयी विरोधी संचालकांचे आरोप खोटे असल्याचे गेल्या वर्षभरात वाढलेल्या दूध संकलानावरून आणि एकूणच झालेल्या गोकुळच्या व्यवसायावरून स्पष्ट होते, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. गोकुळमधील वर्षभारातील आढावा घेण्यासाठी शनिवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषद ते बोलत होते.

मुश्रीफ म्हणाले, राजकारण निवडणुकीपुरते मर्यादित ठेवावे. गोकुळ हा बँड आहे. तो राज्यभर वाढविण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. अशावेळी राजकारणासाठी संचालकांनीच काही तरी बोलायचे हे बरोबर नाही. आम्हीच जर जिल्हा बँकेत असे बोललो तर त्याचा परिणाम ठेवीवर होणारच. त्यामुळे राजकारण निवडणुकीपुरते मर्यादित ठेवावे. प्रत्येकवेळी राजकारणासाठी बोलू नये. पूर्वी गोकुळ त्यांच्या सासर्‍यांच्या ताब्यात होता. आज आमच्या ताब्यात आहे, हा नियतीचा खेळ असून तो चालतच राहणार आहे. त्यामुळे संस्थेवर परिणाम होईल, असे संचालकांनी बोलणे टाळावे. त्यांचे काही प्रश्न असतील तर त्यांनी अध्यक्षांशी चर्चा करावी. सध्या आपली स्पर्धा ‘अमूल’बरोबर आहे. पहिल्या टप्प्यात कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांतील दूध घेऊन गोकुळ बँड वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. अशा वेळी संचालकच संस्थेच्या विरोधात बोलत राहिले तर ते योग्य नाही.

दुधाच्या प्रतीबद्दल विरोधी संचालकांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही, असे सांगून पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, दूध उत्पादकांना केंद्रबिंदू मानून गोकुळमध्ये कारभार सुरू आहे. वर्षात दोन वेळा दूध खरेदी दरात वाढ केली आहे. सर्वात अधिक दर देणारा गोकुळ दूध संघ आहे. त्यामुळे दूध संकलन वाढीसाठी शेजारील जिल्ह्यात देखील प्रयत्?न करणार. या पुढील काळात उपपदार्थावर अधिक भर द्यावा लागणार. मार्केटिंगचे धोरण बदलण्?याच्?याद‍ृष्टीने आमची चर्चा सुरू आहे. दुधाची वाढती मागणी लक्षात घेऊन भोकरपाडा (खोपोली) येथे बारा एकर जमीन खरेदीचा प्रस्ताव दिला आहे.

अमृततुल्य चहाला गोकुळची जोड

गोकुळच्या दुधाला नगरमध्?ये देखील मोठी मागणी आहे. आज ठिकठिकाणी आपणास अमृततुल्य चहाची विक्री केंद्रे दिसत आहेत. या अमृततुल्य चहासाठी बहुतांशी ठिकाणी गोकुळचेच दूध वापरतात. त्?याशिवाय चहा अमृततुल्य होतच नाही, असे मुश्रीफ म्हणाले.

ग्राहकांचा फायदा करायला बसलो नाही : मुश्रीफ

‘गोकुळ’मध्ये सर्व व्यवहार रोखीत आहेत. रुपयाची देखील उधारी राहात नाही. त्यामुळे व्यापारी द‍ृष्टिकोन ठेवूनच ‘गोकुळ’ चालविले पाहिजे. शेवटी हा धंदा आहे. त्यावर नियंत्रण ठेवणे ही आमची जबाबदारी आहे. दूध उत्पादकांनी आमच्यावर विश्वास ठेवून गोकुळमध्ये सत्तांतर केले आहे. त्यामुळे ग्राहकांचा फायदा करायला येथे बसलो नाही तर दूध उत्पादकांच्या भल्यासाठी ‘गोकुळ’मध्ये काम करत असल्याचे मुश्रीफ म्हणाले.

Back to top button