शाहू मिलमध्ये दहा राज्यांच्या लोककलेचे होणार सादरीकरण | पुढारी

शाहू मिलमध्ये दहा राज्यांच्या लोककलेचे होणार सादरीकरण

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष व छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त दि. 14 व 15 रोजी शाहू मिल कोल्हापूर येथे भव्य लोककला सादरीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये 10 राज्यांचे दोनशे लोककलाकार आपली कला सादर करणार असल्याची माहिती दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरचे लेखाधिकारी दीपक पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी ते म्हणाले, शाहू मिल येथे सायंकाळी साडेसहा ते साडेनऊ या वेळेत 9.30 या वेळेत लोककलेचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन शाहू महाराज, पालकमंत्री सतेज पाटील, माजी खासदार संभाजीराजे, जिल्हाधिकारी राहुल रेखावारजी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

या कार्यक्रमामध्ये 10 राज्यांची पारंपरिक व लोकनृत्ये सादर करणार आहेत. यामध्ये पोवाडा, धनगरी गजा, सोंगी मुखवटे, लावणी (महाराष्ट्र), सुदूम बाजा (मध्य प्रदेश), पांधी नृत्य (छत्तीसगड), भांगडा नृत्य (पंजाब), रोफ नृत्य (काश्मीर), सिदूरी धमाल (गुजरात), विहू नृत्य (आसाम), घुमर नृत्य (हरियाणा) व हालाकी सुग्गी कुनिथा (कर्नाटक) यांचा समावेश आहे.

या संपूर्ण कार्यक्रमाची कोरिओग्राफी मुंबईचे प्रसिद्ध कोरिओग्राफर अरविंद रजपूत हे करणार आहेत, असे सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक उदय गायकवाड, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान आज दि. 14 रोजी सकाळी साडेआठ वाजता भवानी मंडप येथून विविध राज्यांतून आलेले दोनशे कलाकार शहरातून कृतज्ञता फेरी काढणार आहेत. शिवाजी पुतळामार्गे ते शाहू समाधी स्थळाला भेट देऊन तेथे आदरांजली वाहणार आहेत.

Back to top button