कोल्हापूर : कावळा नाका-पितळी गणपती रस्ता हरवला! | पुढारी

कोल्हापूर : कावळा नाका-पितळी गणपती रस्ता हरवला!

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
शहरात अनेक ठिकाणी हॉटेल्स, निवासी व व्यापारी संकुलांचे पार्किंग फक्‍त कागदावर आहे. प्रत्यक्षात पार्किंगच्या जागेचा वापरही व्यावसायिक कारणासाठी होत असून वाहनांचे पार्किंग मात्र थेट रस्त्यावर होत आहे. कावळा नाका ते पितळी गणपती रस्ता त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. या रस्त्यावरील विविध हॉटेल्स, निवासी व व्यापारी संकुलांच्या बेकायदा पार्किंगच्या विळख्यात हा रस्ता सापडला आहे.

कावळा नाका ते पितळी गणपती मार्गावर सर्वसामान्य नागरिकांसह व्?हीआयपी लोकांचीही वर्दळ असते. विविध शासकीय कार्यालये, शासकीय विश्रामगृह, मोठमोठी हॉटेल्स मॉल्स, व्यापारी व निवासी संकुलांमुळे हा रस्ता नेहमी गजबजलेला असतो. महापालिका नियमानुसार हॉटेल्स निवासी व व्यापारी संकुलांत त्यांच्या ग्राहकांसह सभासदांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करणे बंधनकारक आहे. मात्र हा नियम या रस्त्यावरील बहुतांश घटकांनी धाब्यावरच बसविलेला दिसतो. स्वत:च्या स्वार्थासाठी नियम धाब्यावर बसविणार्‍यांकडे महापालिका यंत्रणेनेही दुर्लक्ष केले आहे.

या रस्त्यावर कावळा नाका येथून दुतर्फा हॉटेल्स, व्यापारी संकुल आणि निवासी संकुल आहेत. त्यापैकी अनेकांनी पार्किंगच्या जागा व्यावसायिक कारणांसाठी वापरल्याचे दिसून येते. या रस्त्यावर सलग अनेक हॉटेल्स व व्यापारी संकुल असून त्यांच्याकडे येणार्‍या वाहनांची रस्त्याच्या दुतर्फा रांग असते. अशीच स्थिती सावंत बंगल्याजवळ होते. दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्याने रहदारीला अडथळा येतो. परिणामी अपघाताचा धोका वाढतो. या ठिकाणी असणार्‍या चौकात काही महिन्यांपूर्वी अपघात होऊन एका वाहनचालकाचा बळी गेला आहे. या रस्त्याचा फूटपाथ आहे, मात्र फूटपाथवर भाजी आणि फळ विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. हॉटेल व व्यापारी संकुलात येणार्‍या ग्राहकांची वाहने रस्त्यावरच उभी असतात. रस्त्यावर वाहने लावल्याने रस्ता अरुंद होतो. परिणामी या मार्गावरील वाहतुकीस अडथळा होत आहे.

वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते. दुचाकीस्वारांना याचा फटका अधिक बसतो. मोठे वाहन आल्यास दुचाकीस्वाराची पंचाईत होते. सिंचन भवन चौकात भाजी विक्रेते आणि रस्त्यावरील पार्किंगमुळे नागरिकांना चालणेही मुश्कील होते. त्यामुळे वाहनधारकांची मोठी पंचाईत होते. या चौकात केवळ मंत्री आगमनावेळी काही काळ चौक मोकळा होतो. अन्यथा येथील वर्दळ जीवघेणी असते. पितळी गणपतीनजीक रस्त्याच्या दुतर्फा व्यापारी संकुलामुळे येथेही वाहनांच्या रांगा रस्त्यावरच असतात. या ठिकाणीही वाहतुकीची कोंडी नित्याचीच बनली आहे.

मनपा, वाहतूक पोलिसांची बघ्याची भूमिका

या मार्गावर रस्त्यावर वाहनांच्या रांगा असल्या तरी वाहतूक पोलिस मात्र त्याकडे कानाडोळा करीत असल्याचे चित्र आहे. या परिसरात अधिकृत पार्किंगच्या जागेचा व्यावसायिक कारणांसाठी वापर होत असतानही महापालिका प्रशासन मात्र अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. या दोन्ही यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे वाहनधारकांसह पादचार्‍यांना त्रास सहन करावा लागतो.

Back to top button