कोल्हापूर : आजर्‍यात सापडली मानवी कवटी | पुढारी

कोल्हापूर : आजर्‍यात सापडली मानवी कवटी

आजरा; पुढारी वृत्तसेवा: आजरा शहराजवळील रामतीर्थ पर्यटन स्थळाच्या रस्त्याकडेला मानवी कवटी आढळून आली आहे. ही कवटी जादूटोण्यासाठी वापरल्याचा संशय आहे.

ही कवटी रामतीर्थ पर्यटन स्थळाच्या रस्त्याकडेला इलेक्ट्रिक खांबाच्या खाली सुळगाव (ता. आजरा) येथील एका व्यक्‍तीला दिसली. याची माहिती दिल्यावर पोलिसांनी पंचनामा करून ताब्यात घेतली. ही कवटी डीएनएसाठी पाठविण्यात आली आहे. एक वर्षापूर्वीची ही कवटी असल्याचा अंदाज आहे. ती पुरुषाची आहे की स्त्रीची हे डीएनएच्या रिपार्टनंतरच स्पष्ट होईल.

हिरण्यकेशी नदीतून अनेकदा बेवारस मृतदेह वाहून येतात. काहीवेळा ते नदीपात्राच्या कडेला दगडात अथवा झुडपात आढळतात. यापूर्वीही नदीकडेला मानवी हाडेही आढळली आहेत. कुत्र्यांनी ही कवटी बाहेर आणली असल्याची शक्यता आहे. रामतीर्थ परिसरात घनदाट झाडी असून तो निर्जन असल्याने येथे जादूटोण्याचे प्रकारही घडत असतात. यासाठी ही कवटी वापरली असावी, अशी शक्यता आहे.

या कवटीच्या आजूबाजूला जादूटोण्याशी संबंधित वस्तू आढळून आल्या आहेत. कवटीवर आघात झाला किंवा नाही याचीही माहिती डीएनएनंतरच मिळणार असल्याचे पोलीसांनी सांगितले. रामतीर्थ हे पर्यटन क्षेत्र आहे. पर्यटकांची रेलचेल नेहमी असते. येथे धार्मिक कार्यक्रमही होतात. मात्र, येथे प्रथमच असा प्रकार आढळला आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button