राधागरी : धरणाचे स्वयंचलीत दरवाजे उघडतात तरी कसे?

कौलव (राजेंद्र दा. पाटील); पुढारी वृत्तसेवा : जवळपास साडे ८ टीएमसी पाणी साठवण क्षमतेच्या राधानगरी धरणाचे अतिरिक्त पाणी कोणत्याही यांत्रिक ऊर्जेचा वापर न करता बाहेर काढायचे म्हटल्यानंतर त्याला वेड्यात काढले जाईल!

मात्र, तत्कालीन स्थापत्य अभियांत्रिकी कौशल्याने ही गोष्ट ७० वर्षापुर्वी सत्यात उतरवली आहे. राजर्षि शाहू महाराजांच्या दुरदृष्टीतून साकारलेल्या राधानगरी धरणावर सात दशकानंतरही मजबूत असलेले हे स्वयंचलीत दरवाजे आधुनिक तंत्रज्ञानालाही एक कोडेच आहेत.

1896-97 साली पडलेल्या भीषण दुष्काळात राधानगरी धरणाच्या उभारणीची बीजे रोवली गेली होती. या दुष्काळानंतर शाहूराजांनी कोल्हापूर संस्थानाचे स्वतंत्र सिंचन धोरण आखून 1908 साली राधानगरी धरणाची पायाभरणी केली होती. जगप्रसिद्ध स्थापत्य अभियंता सर एम.विश्वेश्वरय्या यांनी या धरणाचा स्थापत्य आराखडा तयार केला होता.

पुढे पहिले महायुध्द, शाहू राजांचे आकस्मित निधन व पैशाची अडचण परत दुसरे महायुध्द यामुळे रेंगाळलेले धरणात 1949 साली प्रथमच सुमारे पाऊण (0.600) टीएमसी पाणीसाठा निर्माण करण्यात आला होता. पुढे 1952 साली धरणाच्या पायथ्याला राज्यातील पहिले जलविद्युत केंद्राची उभारणी पुर्ण झाल्यानंतर धरणाचे स्वप्न पुर्णत्वाला आले. त्यादरम्यानच धरणाच्या उत्तरेला सात स्वयंचलीत दरवाजे बसवण्यात आले.

आज सत्तराव्या वर्षातही हे स्वयंचलीत दरवाजे संपुर्ण देशातील स्थापत्य अभियांत्रिकीच्या कुतुहलाचा केंद्रबिंदू आहेत. या प्रत्येक दरवाजाची लांबी 14.48 मीटर्स तर उंची 1.48 मीटर्स एवढी आहे. या सात दरवाजांतून प्रतिसेकंद दहा हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होतो. त्यामुळे धरणातील अतिरिक्त पाण्याचा निचरा होतो.

या दरवाजाच्या आतील बाजूला प्रत्येकी 35 टन वजनाचे सिमेंट क्राँक्रीटचे ब्लॉक्स बसवलेले आहेत. धरण पुर्ण क्षमतेने भरल्यानंतर अतिरिक्त पाण्याचा दाब दरवाजांवर पडतो. सिमेंट काँक्रीटचे ब्लॉक वर उचलले जातात व पाणी बाहेर फेकले जाते. ब्लॉकवरील दाब 35 टनापेक्षा खाली आल्यानंतर दरवाजे खाली बसतात व पाण्याचा विसर्ग थांबतो.या दरवाजांसाठी कोणतीही यांत्रिक ऊर्जा वापरली जात नाही ही बाब वैशिष्ठ्यपुर्ण आहे.

आज सत्तराव्या वर्षातही हे दरवाजे पुर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. दरवाजासाठी उच्च दर्जाचे लोखंडी साहित्य वापरल्यामुळे ते मजबुत आहेत. देखभाल दुरुस्तीचा खर्च नाममात्र असून एखादेवेळी काँक्रीटच्या ब्लॉकची झीज झाल्यास त्याची दुरूस्ती केली जाते.

दरवर्षी केवळ ग्रिसिंग व ओव्हर ऑईलींग केले जाते. त्यामुळे हे दरवाजे खर्चिकही नाहीत.हे दरवाजे सत्तरीतही धरणातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करून धरणाच्या सुरक्षिततेला हातभार लावतात त्यामुळे हे दरवाजे धरणाचे राखणदारच म्हटल्यास वावगे ठरू नये.

वक्राकार दरवाजांचा प्रस्ताव

सात स्वयंचलीत दरवाजांच्या जागी नवीन वक्राकार दरवाजे बसवण्याचा प्रस्ताव ऐरणीवर आला होता.मात्र शाहू प्रेमी जनतेने हा ऐतिहासिक ठेवा काढण्यास तीव्र विरोध केला.

त्यामुळे हा प्रस्ताव बारगळला. त्याऐवजी उत्तरेकडील टेकडीजवळ वक्राकार दरवाजे बसवण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी अत्याधुनिक दरवाजांच्या प्रस्तावाची दखल घेतल्याने स्वयंचलीत दरवाजांचे अस्तित्व ठेऊन दरवाजांच्या अत्याधुनिकीकरणाच्या प्रस्तावावरील धुळ झटकली आहे.

देशात एकमेव दरवाजे

स्वयंचलीत दरवाजे असलेले राधानगरी धरण हे देशातील एकमेव धरण आहे.आज ही हे दरवाजे सक्षम असल्याने व खर्चिक नसल्यामुळे हे दरवाजे ऐतिहासिक वारसा म्हणून जतन करण्याच्या मागणीवर शाहूप्रेमी जनता ठाम आहे.

Back to top button