स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढण्यावर मतभेद : शरद पवार | पुढारी

स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढण्यावर मतभेद : शरद पवार

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याबाबत मतभेद आहेत. एकत्र लढायचे की, स्वतंत्र लढून एकत्र यायचे, यावर राष्ट्रवादीत मतमतांतरे आहेत. तरीही यासंदर्भात काँग्रेस, शिवसेनेशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे खा. शरद पवार यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया दोन आठवड्यांत पूर्ण करा, असे न्यायालयाने निर्देश दिले आहेत. याचा अर्थ दोन आठवड्यांत निवडणुका घ्या, असा होत नसल्याचे आपले मत आहे. ज्या टप्प्यावर निवडणूक थांबली आहे तेथून पुढे प्रक्रिया सुरू करावयाची. त्यामुळे अजून तीन-चार महिने निवडणुका होऊ शकत नाहीत, असे सांगून शरद पवार म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरू आहे.

स्वतंत्र लढावे, असे काही कार्यकर्त्यांचे मत आहे. राज्यात एकत्र आहोत, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही एकत्र लढणे संयुक्त होईल, असे काहींचे मत आहे. अशीच चर्चा काँग्रेसला व शिवसेनेला पक्षांतर्गत करावी लागेल. त्यानंतर आम्ही सर्व प्रमुख मंडळी एकत्र येऊन चर्चा करावी लागेल. त्यानंतर निर्णय घेतला जाईल.

पवार म्हणाले की, कोरेगाव-भीमामध्ये वाद निर्माण झाला. तो मिटविण्याची जबाबदारी तत्कालीन भाजप सरकारचीच होती. कोरेगाव -भीमा प्रकरणात राजद्रोहाचे गुन्हे दाखल केले. यावर आपण या कायद्यात बदल करण्याची भूमिका मांडली होती. आता राजद्रोह कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेत असतील, तर योग्यच आहे. माझा नातू काल अयोध्येला जाऊन आला. राज ठाकरे अयोध्येला चाललेत त्यात काय विशेष? कोणीही कोठे जाऊ शकतो, असे एका प्रश्नाला उत्तर देत पवार म्हणाले.

भाजपने सत्तेवर येण्यापूर्वी जी आश्वासने दिली होती. सत्तेवर आल्यानंतर त्यातील एकाही आश्वसनाची पूर्तता ते करू शकले नाहीत. महागाई, बेरोजगारीचा प्रश्न प्रचंड गंभीर बनला आहे. याच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरू लागले आहेत. पुढील काळात ही चळवळ अधिक व्यापक बनेल. त्यामुळे या मूलभूत प्रश्नांपासून लोकांचे लक्ष विचलित करण्याकरिता भोंग्यांसारखे प्रश्न निर्माण करून धार्मिक भावनांच्या आधारे चळवळी उभा केल्या जात आहेत.

महाराष्ट्रामध्ये एखादा प्रश्न निर्माण झाला, तर महाराष्ट्रातील सर्व खासदार पक्षीय राजकारण बाजूला ठेवून एकत्र येतात. यामध्ये संभाजीराजे यांचे कायम सहकार्य राहिले आहे. मुदत संपल्यानंतर त्यांच्याशी आपली काही चर्चा झालेली नाही; पण राष्ट्रवादीतून त्यांना राज्यसभेवर घ्यायचे झाल्यास काँग्रेस व शिवसेना यांच्याशी चर्चा करून एकत्रित निर्णय घेऊ, असेही पवार म्हणाले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, व्ही. बी. पाटील, व्यंकाप्पा भोसले उपस्थित होते.

26,000 कोटी केंद्र सरकार कधी देणार?

संपूर्ण देशात केंद्राला कर मिळवून देण्यात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. केंद्र शासनाकडे महाराष्ट्र राज्याची 26,000 कोटी देय रक्कम आहे. ही रक्कम जर केंद्र शासन देत नसेल, तर त्याचा परिणाम विकासकामांवर होणार, असे पवार यांनी सांगितले.

Back to top button