कोल्हापूर : पन्हाळा मुख्य रस्ता सुरू | पुढारी

कोल्हापूर : पन्हाळा मुख्य रस्ता सुरू

पन्हाळा : पुढारी वृत्तसेवा पन्हाळ्याचा मुख्य रस्ता शनिवारी सर्वांसाठी खुला करण्यात आला. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते, तर खा. धैर्यशील माने, आ. डॉ. विनय कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी साडेपाच वाजता याचे लोकार्पण करण्यात आले. या रस्त्यावरून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली. हा रस्ता पन्हाळ्याची जीवनवाहिनी असून, जिल्ह्यात प्रथमच अत्याधुनिक

अशा जिओ ग्रेड टेक्निकने या रस्त्याचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे पन्हाळा पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. पर्यटनाला गती मिळावी व पन्हाळ्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी विविध विकासकामे लवकरात लवकर पूर्ण केली जातील, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.

जोतिबा-पावनगड रोप-वे

पन्हाळगडावर बारा कोटी रुपयांचा लाईट साऊंड प्रकल्प तसेच जोतिबा-पावनगडदरम्यान रोप-वे प्रस्तावित आहे. पर्यटन मंत्रालयासोबत लवकरच बैठक लावून ही कामे मार्गी लावली जातील. जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी पर्यटनाचा नवा डीपीआर तयार करून व पर्यटनाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणास चालना मिळेल व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होऊ शकेल, असे पालकमंत्री म्हणाले.

रस्ता वरदान ठरावा ः खा. माने

पन्हाळा मुख्य रस्ता हा पन्हाळकरांसाठी वरदान ठरावा. गेले नऊ महिने ठप्प झालेले पर्यटन पुन्हा सुरू व्हावे, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने व ठेकेदार शिवाजी मोहिते यांनी नेटके काम केले आहे, असे खा. धैर्यशील माने म्हणाले, रस्ता खचण्याचा अभ्यास व्हावा ः कोरे

पन्हाळ्याचा मुख्य रस्ता खचण्याच्या मुख्य कारणांचा अभ्यास व्हावा. गडावरून निचरा होऊन जाणारे पाणी व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचा घटक आहे; मात्र आपल्याकडील स्थापत्यशास्त्र म्हणावे तितके विकसित झालेले नाही. पूर्ण अभ्यास न करता जागोजागी सिमेंटच्या भिंती उभारल्यामुळे पाणी निचरा होऊ शकला नाही व पूर्ण रस्ता खचला. यापुढे पन्हाळा रस्ता कधीही बंद होऊ नये, यासाठी उर्वरित रस्ता बांधणीचे काम पूर्ण व्हावे. त्याचबरोबर वन विभागाने 265 मीटरचे काम सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, असे आ. विनय कोरे यांनी सांगितले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. बी. कुंभार, माजी नगराध्यक्ष रूपाली धडेल, ‘गोकुळ’चे संचालक करणसिंह गायकवाड, बाबासो चौगले, जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने, शिवाजीराव मोरे, शंकर पाटील आदी उपस्थित होते. ठेकेदार शिवाजी मोहिते व ध्रुव मोहिते यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय काटकर यांनी प्रास्ताविक केले. राज्यातील विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन जिओ ग्रेड पद्धतीने हे काम प्रथमच करण्यात आले असून, हा रस्ता सुरक्षित व भक्कम स्वरूपात बांधण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नगरपालिका प्रशासक स्वरूप खारगे यांनी आभार मानले.

नऊ महिन्यांनंतर रस्ता खुला

पन्हाळा मुख्य रस्ता शनिवारपासून खुला झाल्याने पन्हाळा नागरिकांतून व पर्यटकांतून समाधान व्यक्त होत आहे. नऊ महिन्यांनी रस्ता पूर्ण झाला आहे.आता या रस्त्यावर सिमेंटचा शेवटचा थर टाकल्यानंतर अवजड वाहनांनाही तो खुला होईल. पन्हाळ्यावर एस.टी. बससेवा लवकर सुरू व्हावी, याद़ृष्टीने काम पूर्ण व्हावे, अशी मागणी करण्यात आली. पावसाळ्यात तलावांच्या भिंतीही पडल्या आहेत. त्यांची पुनर्बांधणी करण्यात यावी, असे निवेदन नागरिकांच्या वतीने पालकमंत्री पाटील यांना देण्यात आले.

हेही वाचलतं का?

Back to top button