उदगावच्या अपूर्ण पुलामुळेच महापुरात सांगली-कोल्हापूर मार्ग बंद | पुढारी

उदगावच्या अपूर्ण पुलामुळेच महापुरात सांगली-कोल्हापूर मार्ग बंद

जयसिंगपूर : संतोष बामणे

सांगली-कोल्हापूर मुख्य मार्गावर वाहतुकीच्या कोंडीवर पर्याय म्हणून उदगाव ते तमदलगे असा 12.50 कि. मी.चा बायपास काढण्यात आला. उदगाव (ता.शिरोळ) येथील रेल्वे ओढ्याजवळ नवीन पूल बांधकाम हातात घेऊन तब्बल 1.5 कि. मी.चा बाह्यवळण मार्ग काढून थेट केला.

मात्र, या पुलाच्या भराव्याला शेतकर्‍यांनी विरोध करून पर्यायी शेतीच्या रस्त्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामुळे या पुलाचे काम गेल्या 9 वर्षांपासून अपूर्ण स्थितीत आहे. हा पूल पूर्ण झाला असता, तर महापुरात 2019 व आता आलेल्या महापुरात सांगली कोल्हापूर महामार्ग सुरू राहिला असता, हे मात्र निश्चित!

कोल्हापूर-सांगलीदरम्यानच्या 52.62 किलोमीटर महामार्गाच्या कामाला दि. 20 ऑक्टोबर 2012 रोजी सुरुवात झाली. हे काम पूर्ण करण्यासाठी 2 जानेवारी 2015 पर्यंत मुदत देण्यात आली होती. या कालावधीत काम पूर्ण न झाल्याने त्यांनतर 75 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली.

यामध्ये मुख्य सांगली कोल्हापूर (उदगाव-जयसिंगपूर मार्गे) महामार्गावरील कोंडी दूर करण्यासाठी बायपास काढण्यात आला. उदगाव येथील ओढ्यावर मोठा पूल बांधकाम हाती घेण्यात आला; मात्र या पुलाचे बांधकाम गेल्या 9 वर्षांपासून रखडले आहे.

2019 मध्ये तब्बल 16 दिवस, तर आता आलेल्या महापुरात मुख्य महामार्ग 6 दिवस व बायपास 9 दिवस बंद राहिल्याने सांगली-कोल्हापूर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सुप्रीम कंपनीने शेतकर्‍यांच्या मागणीचा विचार करून पुलाचे बांधकाम पूर्ण केले असते, तर सांगली-कोल्हापूर महामार्ग महापुरातही सुरू राहिला असता.

आता राष्ट्रीय महामार्गात प्राधान्य हवे

सांगली-कोल्हापूर महामार्गाचे रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गात विलगीकरण होण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. त्याला 25 जून 2021 रोजी मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता यात प्रामुख्याने उदगाव येथील अपूर्ण पूल पूर्ण करून घेणे गरजेचे आहे, तरच महापुरात सांगली-कोल्हापूर महामार्ग सुरू राहील.

उदगावच्या हद्दीतील 300 एकर जमीन या पुलाच्या पलीकडे आहे. पूल बांधकामावेळी तत्कालीन आमदार, बांधकाम विभाग व सुप्रीम कंपनीच्या अधिकारी यांच्याबरोबर चर्चा करून आम्हाला या बायपासवर भरावाखालून जोड रस्ता करून देण्याची मागणी केली होती. याकडे सर्वांनी दुर्लक्ष केल्याने येथील सर्व शेतकर्‍यांनी रस्त्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
– बापूसो साखळे, शेतकरी, उदगाव

Back to top button