जयसिंगपूर : अकिवाट, टाकळीवाडीत ‘एमआयडीसी’ होणार | पुढारी

जयसिंगपूर : अकिवाट, टाकळीवाडीत ‘एमआयडीसी’ होणार

जयसिंगपूर : संतोष बामणे

शिरोळ तालुक्यात 52 गावे व तीन शहरांचा समावेश आहे. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यात चौथी औद्योगिक वसाहत अकिवाट, टाकळीवाडीच्या माळावर स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

चार दिवसांपूर्वी उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्यासमवेत मुंबई मंत्रालयात याबाबत बैठक झाली आहे. त्यामुळे येत्या दहा दिवसांत राज्य सरकारचे पथक अकिवाट, टाकळीवाडी येथे पाहणीसाठी येणार आहे.

सध्या तालुक्यात यड्राव येथे पार्वती इंडस्ट्रियल, उदगाव येथे ल. क. अकिवाटे औद्योगिक वसाहत व मौजे आगर येथे राजर्षी शाहू इंडस्ट्रियल कार्यरत आहे. या औद्योगिक वसाहतींमध्ये 50 हजार नागरिकांच्या हाताला काम मिळाले आहे. मात्र, या तीन औद्योगिक वसाहती जयसिंगपूर, शिरोळ परिसरात असल्याने शिरोळ तालुक्याच्या दक्षिण भागातील सैनिक टाकळी, कुरूंदवाड, टाकळीवाडी, अकिवाट, हेरवाड, अब्दुललाट, घोसरवाड यासह अन्य गावांतील स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी या ठिकाणी एमआयडीसी उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत.

अकिवाट व टाकळीवाडी गावच्या हद्दीत गुरुदत्त साखर कारखान्याच्या परिसरात शासकीय जागा उपलब्ध आहे. त्यामुळे या परिसरात उद्योग, व्यवसाय उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आता शिरोळ दक्षिण भागातील स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

द़ृष्टिक्षेपात औद्योगिक वसाहती

 • उदगाव-ल.क. अकिवाटे औद्योगिक वसाहत
  उद्योग-व्यवसाय : 135
  कामगार : 10 ते 11 हजार
  वार्षिक उलाढाल : 900 कोटी रुपये

 

 • यड्राव-पार्वती इंडस्ट्रियल इस्टेट
  उद्योग-व्यवसाय : 350
  कामगार : 17 ते 18 हजार
  वार्षिक उलाढाल : 1,100 कोटी रुपये

 

 • मौजे आगर-राजर्षी शाहू इंडस्ट्रिज इस्टेट
  उद्योग-व्यवसाय : 250
  कामगार : 8 ते 10 हजार
  वार्षिक उलाढाल : 650 कोटी रुपये

 

युवकांच्या हातात आंदोलनाचे झेंडे व दगड देण्यापेक्षा रोजगार देणे गरजेचे आहे. शिरोळच्या दक्षिण भागातील नागरिकांनाही आपल्या गावाजवळ रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी अकिवाट व टाकळीवाडी परिसरात औद्योगिक वसाहत उभी करण्यात येणार आहे.
– राजेंद्र पाटील- यड्रावकर, आरोग्य राज्यमंत्री

 

Back to top button