पन्हाळा : पावनगडच्या पायथ्याशी आढळले दोन मृत गवे | पुढारी

पन्हाळा : पावनगडच्या पायथ्याशी आढळले दोन मृत गवे

पन्हाळा; पुढारी वृत्तसेवा : पन्हाळा-पावनगडच्या पायथ्याला असणार्‍या धबधबेवाडी, राक्षी वनक्षेत्र परिसरात शुक्रवारी सकाळी दोन वृद्ध गवे मृतावस्थेत आढळले, अशी माहिती पन्हाळा वनपरिक्षेत्रचे वनपाल विजय दाते यांनी दिली आहे.

वनपाल दाते म्हणाले, की वनरक्षक संदीप पाटील, अमर माने, वनसेवक पांडुरंग पाटील, यशवंत पाटील, तानाजी लवटे, राक्षी वनक्षेत्र भागात गस्त घालत होते. यावेळी गणेश तळी व उंबर माळ जंगलात एक नर व मादी गवा मृतावस्थेत आढळला. वनरक्षक संदीप पाटील यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मोहिते यांना याबाबत कळविले.

मोहिते, वनपाल दाते घटनास्थळी पोहोचले व पंचनामा केला. दोन्ही गवे हे वृद्ध झाले असल्याने मयत झाले असावेत, असे वनपरिक्षेत्र अधिकारी मोहिते यांनी माहिती देताना सांगितले. दोन्ही ठिकाणी वन विभागाच्या नियमानुसार पंचनामा करून सदर मृतावस्थेतील गव्यांचा योग्य पद्धतीने विल्हेवाट लावल्याचे वनपाल दाते यांनी सांगितले.

पन्हाळा परिसरात पावनगडच्या जंगलामध्ये सुमारे साठ गव्यांचा कळप आहे. या कळपातील दोन गवे मृतावस्थेत आढळल्याची ही पहिलीच वेळ आहे.

Back to top button