राजेंद्र पाटील यड्रावकर : विजय वडेट्टीवारांकडे पुरबाधित शिरोळच्या मांडल्या व्यथा | पुढारी

राजेंद्र पाटील यड्रावकर : विजय वडेट्टीवारांकडे पुरबाधित शिरोळच्या मांडल्या व्यथा

जयसिंगपूर; पुढारी वृत्तसेवा: शिरोळ मधील पुरबाधित गावच्या व्यथा आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे  मांडल्या. शिरोळ तालुक्यातील पूरबाधित गावांमधील नुकसान भरपाईसाठीचे पंचनामे महसूल व कृषी विभागाकडून सुरू आहेत.

ज्यांच्या घरात महापुराचे पाणी आले होते अशा परिवाराला सानुग्रह अनुदान देण्याबाबतचा राज्य सरकारचा निकष निश्चित आहे.

जी गावे महापुराच्या पाण्याने संपूर्ण वेढली गेली होती. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यात आला.  या गावांमधील ग्रामस्थांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर केले होते.

अशा सर्व गावांना आणि त्या गावातील प्रत्येक परिवाराला सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळावा अशी मागणी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली.

दरम्यान, यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही विजय वडेट्टीवार यांनी राजेंद्र यड्रावकर यांना दिली आहे.

निवेदनात, २०१९ च्या महापुरानंतर नुकसानीचे पंचनामे होऊन महाविकास आघाडी सरकारने पुरग्रस्तांना चांगली मदत केली होती. परंतु, काही चुकीच्या निकषामुळे अनेक नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाईपासून वंचित रहावे लागले होते.

यामध्ये शेतकऱ्यांचे विद्युत मोटारी व संच, शेडनेट, ठिबक सिंचन पाईप्स व ग्रीन हाऊस यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नव्हती.

सहकारी संस्था व खाजगी मालकीच्या गोडाऊनमधील खत साठ्यांचे व औषधांचे नुकसान होऊन देखील त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही.

त्यामुळे २०१९ मध्ये नुकसान भरपाईपासून वंचित राहिलेल्या या सर्व घटकांना यावेळी नुकसान भरपाई मिळावी असेही यड्रावकर यांनी वडेट्टीवार यांच्या निदर्शनास आणून दिले.

शेतकरी शेतीपूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन व्यवसाय करीत असतो. २०१९ च्या महापुरानंतर कुकुटपालन व्यवसायाचे मोठे नुकसान झाले होते. पण, चुकीच्या निकषामुळे या व्यवसायिकांना तुटपुंजी मदत मिळाली होती.

पंचनामे करताना यावेळी कुकूटपालन व्यवसाय संबंधीचे नुकसान भरपाईबाबतचे असलेले निकष बदलावेत असा आग्रह वडेट्टीवार यांच्याकडे केला असल्याचे यड्रावकर यांनी सांगितले आहे.

पुनवर्सनासाठी शासन तयार : वडेट्टीवार

कोकण व पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुराचा सर्वाधिक फटका हा शिरोळ तालुक्याला बसला आहे. ४३ गावांना यांचा नेहमी सामना करावा लागतो. यामुळे महाविकास आघाडी सरकारकडून यावर ठोस निर्णय घेऊ.

त्याचबरोबर सानुग्रह अनुदान, शेती, पडझड घरे यासाठी ११ हजार ५०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. तर जे पुरबाधित पुनवर्सनासाठी तयार आहेत.

त्याचे पुनवर्सन करण्यासाठी सरकार तयार असल्याचे वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचलंत का? 

Back to top button