कोल्हापूर : विमानसेवा लवकरच विस्तारणार | पुढारी

कोल्हापूर : विमानसेवा लवकरच विस्तारणार

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरची विमानसेवा लवकरच विस्तारणार आहे. विमानतळ विस्तारीकरणाचे काम येत्या वर्षअखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. यानंतर विमानसेवेला गती येणार आहे. कोल्हापूर राज्यातील प्रमुख शहरांसह देशातील प्रमुख शहरांशी हवाई मार्गाने जोडले जाईल.

‘उडान’ योजनेंतर्गत कोल्हापूर मुंबई, हैदराबाद, तिरुपती, बंगळूर या शहरांशी जोडले गेले आहे. प्रवाशांची मागणी असल्याने कोल्हापूर-अहमदाबाद अशीही विमानसेवा सुरू झाली आहे. महाराष्ट्रासह तेलगंणा, कर्नाटक, गुजरात अशा तीन राज्यांच्या राजधानीशी कोल्हापूर जोडले गेले आहे. तीन राज्यांच्या राजधानीला हवाईमार्गाने जोडले गेलेले मुंबई, पुणे, नागपूरनंतर कोल्हापूर शहर ठरले आहे.

विमानतळावर सुरू असलेली विस्तारीकरणाची कामे पूर्ण झाल्यानंतर विमानसेवाही विस्तारली जाईल. सध्या 1930 मीटर धावपट्टीचे काम पूर्ण झाले आहे. येत्या दोन महिन्यांत या धावपट्टीचा वापर सुरू होईल. याबरोबर नव्याने बांधलेल्या अ‍ॅप्रनचाही वापर केला जाईल. 1930 मीटर धावपट्टीमुळे विमान कंपन्यांकडून विमान प्रवासी संख्या वाढवली जाईल. याखेरीज अन्य काही कंपन्यांची विमानेही सुरू होतील. सध्या अपुर्‍या धावपट्टीमुळे काही विमान कंपन्यांना मर्यादा येत आहेत. वाढीव धावपट्टीचा वापर सुरू होणार असल्याने या कंपन्यांनीही विमानसेवेबाबत हालचाली सुरू केल्या आहेत.

सध्या दोनच विमानांचे पार्किंग करण्याची सुविधा विमानतळावर आहे. नवा अ‍ॅप्रनचा वापर सुरू झाल्यानंतर तीन एटीआर, एक एअरबस यासह एकूण पाच विमाने एकाच वेळी पार्क करता येणार आहेत. त्यातच नाईट लँडिंग सुरू झाल्यानंतर पुणे-मुंबईतील विमाने पार्किंगसाठी कोल्हापुरात येतील, त्यामुळे कोल्हापुरातील दैनंदिन विमानांची संख्या तर वाढेलच; पण कोल्हापूर अनेक शहरांशी जोडले जाणार आहे.

कोल्हापूर विमानतळाला कार्गोची परवानगी मिळाली आहे. सध्या प्रवासी विमानातूनच मालवाहतूक केली जाणार आहे. त्याची सुरुवात केली असून, सध्या विमानातून कोल्हापुरात चांदी येत आहे. कोल्हापूर आणि परिसरातील फुले तसेच अन्य मालवाहतुकीसाठी विमान कंपन्यांनी आवश्यक ती तयारी सुरू केली आहे. यामुळे विमानतळावरील मालवाहतूकही येत्या काही वर्षांत वाढणार आहे.

Back to top button