कोल्हापूर : उद्या रंगणार ‘रंग चैत्राचे’ | पुढारी

कोल्हापूर : उद्या रंगणार ‘रंग चैत्राचे’

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : गुढी पाडव्यापासून चैत्र महिना सुरू होतो. मराठी नववर्षातील हा पहिला महिना. झाडा-वेलींना नवी पालवी फुटते आणि अशाचवेळी घरोघरी चैत्र गौर बसविली जाते. आरास करून अक्षयतृतीयेपर्यंत तिची मनोभावे पूजा केली जाते. स्त्रिया हळदी-कुंकू समारंभ साजरा करून एकमेकींना पन्हे, कैरी, डाळ, कोशिंबीर देऊन हा सण साजरा करतात. म्हणूनच दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबतर्फे चैत्र गौरी हळदी-कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

हळदी-कुंकू समारंभासोबतच महिलांना मनोरंजनाचा एकेरी, दुहेरीच नव्हे तर तब्बल तिहेरी धमाका दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लब आयोजित चैत्र गौरी हळदी-कुंकू समारंभात अनुभवता येणार आहे.

राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन येथे मंगळवारी (दि.26) दुपारी 3.30 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमात कलर्स मराठीवरील ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतील अंतरा आणि मल्हार तसेच ‘राजाराणीची गं जोडी’ या मालिकेतील संजीवनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यानिमित्ताने त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधीही महिलांना मिळणार आहे. हा कार्यक्रम सर्व महिलांसाठी खुला राहणार आहे .

कार्यक्रमात ‘कलर थीम’ असून, लाल, हिरवा किंवा पिवळ्या रंगांतील साड्यांमध्ये महिलांना कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे. हळदी- कुंकू समारंभासोबतच प्रल्हाद-विक्रम प्रस्तुत गाण्यांचा सुरेल कार्यक्रम आणि विविध स्पर्धा, फनी गेम्सची मजा एकाच कार्यक्रमात महिलांना लुटता येणार आहे. या धमाल खेळातून महिलांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधीही मिळणार आहे. कार्यक्रमास उपस्थित प्रत्येक महिलेला पन्हे, कोशिंबीर देऊन चैत्र गौरीचा हळदी-कुंकू समारंभ साजरा केला जाणार आहे. अस्सल मराठमोळ्या वेशात साजशृंगार करून कार्यक्रमात सहभागी व्हावे, तसेच

कार्यक्रम वेळेत सुरू होणार असून महिलांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ः 8483926989, 9096853977.

Back to top button