कोल्हापूर : 2024 मध्ये बहुरंगी लढत; शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी स्वतंत्र लढण्याची शक्यता, भाजपही रिंगणात | पुढारी

कोल्हापूर : 2024 मध्ये बहुरंगी लढत; शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी स्वतंत्र लढण्याची शक्यता, भाजपही रिंगणात

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली काँग्रेसने कशीबशी बाजी मारली. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर काँग्रेसने वर्चस्व मिळवले. काँग्रेस पुन्हा या मतदारसंघावर हक्‍क सांगणार हे स्पष्ट आहे. परंतु, अस्तित्व टिकविण्यासाठी शिवसेनेला रणांगणात उतरावेच लागेल. लक्षवेधक मते घेऊन चिवट झुंज देणारा भाजपही मैदानात असेल. कोल्हापूर शहरात फक्‍त नावापुरता उरलेला राष्ट्रवादीही निवडणूक लढवेल. त्यामुळे 2024 ची पंचवार्षिक निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यता आहे. भाजप, काँग्रेस, शिवसेना यांच्यात थेट सामना होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव विजयी झाल्या. प्रचाराचा धूमधडाका सुरू असतानाच 2024 च्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली. काँग्रेसकडून माजी आ. मालोजीराजे व मधुरिमाराजे यांनी सभांतून ज्या आक्रमकपणे प्रचार केला ते पाहता पुढील निवडणुकीची बांधणी म्हणूनच त्यांची तयारी सुरू असल्याचे दिसून आले. काँग्रेसच्या विजयानंतर मालोजीराजे यांच्या समर्थकांनी काँग्रेसचे पुढील दावेदार म्हणूनही पोस्टरबाजी केली. यामुळे 2024 ला जयश्री जाधव यांना काँग्रेसची उमेदवारी नसेल? असे भाकीत वर्तवले जात आहे. परंतु, अद्याप दोन-अडीच वर्षांचा कालावधी असल्याने अनेक घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आण्णांच्या माघारी… आता आपली जबाबदारी… म्हणून पालकमंत्री सतेज पाटील हे जयश्री जाधव यांच्या पाठीशी राहिले. मात्र, 2024 च्या निवडणुकीत जाधव यांना वार्‍यावर सोडायचे का? असा प्रश्‍न पालकमंत्री पाटील यांच्यासमोर असेल.

1990 पासून कोल्हापूर उत्तर विधासभेच्या सातपैकी पाच निवडणुकांत शिवसेनेने विजय मिळविला आहे. 2019 च्या निवडणुकीत चंद्रकांत जाधव यांनी हा मतदारसंघ काँग्रेसकडे खेचून घेतला. आ. जाधव यांच्या अकाली निधनाने पोटनिवडणूक लागली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची माघार घेत महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. कधीही हाताच्या चिन्हासमोरचे बटन न दाबणार्‍या शिवसैनिकांना यंदाच्या पोटनिवडणुकीत मात्र हाताला मतदान करण्याचे आवाहन शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले. त्यासाठी शिवसेनेच्या नेतेमंडळींचा कोल्हापुरात राबता होता. परंतु, आता कोल्हापुरात शिवसेना जिवंत ठेवायची असेल तर 2024 ची निवडणूक लढविण्याशिवाय नेतेमंडळींसमोर पर्याय नाही, अशी शिवसैनिकांची भावना आहे. अस्तित्व टिकविण्यासाठी शिवसेना मैदानात उतरणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे यंदाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला मतदान करायला लावणार्‍या नेत्यांची पुन्हा धनुष्यबाणाला मतदान करा, हे आवाहन शिवसैनिकांच्या कितपत पचनी पडणार? याची चर्चा आहे.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या प्रत्येक निवडणुकीत भाजपने लक्षणीय मते घेतली. भाजपच्या मतदारांत वाढ होत असताना दिसत आहे. पोटनिवडणुकीत काँग्रेस-शिवसेना-राष्ट्र?वादीसह मित्रपक्ष एकत्र आले. परंतु, भाजप एकटा लढला. तरीही तब्बल 78 हजार मते घेतली. ही मते नक्‍कीच महाविकास आघाडीची चिंता वाढविणारी आहेत. महाविकास आघाडी स्वतंत्रणे रिंगणात उतरली असती तर निश्‍चितच निकाल वेगळा पाहावयास मिळाला असता, असे बोलले जाते. 2014 च्या निवडणुकीत भाजपला 41 हजार मते मिळाली होती. त्या तुलनेत यंदाच्या पोटनिवडणुकीत मतांत दुपटीने वाढ झाली आहे. 2019 मध्ये भाजप-शिवसेना युती असूनही शिवसेना उमेदवाराला 75 हजार मते मिळाली होती. त्यापेक्षा जास्त मते भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांनी घेतली आहेत. 2024 च्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना स्वतंत्रपणे लढल्यास भाजपला मिळालेली मते नक्‍कीच विजयासमीप असतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

2024 चे संभाव्य उमेदवार

2024 च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांच्याबरोबरच माजी आमदार मालोजीराजे हेही प्रबळ दावेदार असणार आहेत. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सतेज पाटील हे जाधव यांच्या पारड्यात आपले वजन टाकणार की मालोजीराजे यांच्या पाठीशी उभारणार, याची चर्चा आतापासून सुरू आहे. त्याचबरोबर शिवसेनेचा उमेदवार रिंगणात असेल. आतापासून अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देणार की आपला उमेदवार उभा करणार, हे आघाडीतच ठरणार आहे.

मनपा निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढणार?

जिल्ह्यातील विविध निवडणुका महाविकास आघाडीच्या झेंड्याखालीच लढविण्यात आल्या. ‘गोकुळ’ची निवडणूक महाविकास आघाडीने एकसंधपणे लढवली. मात्र, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला डावलले. तसेच भाजपला सोबत घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीने जिल्हा बँक ताब्यात घेतली. कोल्हापूर महापालिकेची निवडणूक येऊ घातलेली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची भूमिका यापूर्वीच जाहीर केली आहे. राजकीय समीकरणे पाहता महाविकास आघाडी यापुढील निवडणुकांत स्वतंत्रपणे रिंगणात उतरण्याची बीजे या निवडणुकीतच रोवली जातील, अशी शक्यता आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या एकजुटीचे भवितव्य यावर अवलंबून असेल.

Back to top button