पक्ष बळकटीसाठी राष्ट्रवादी पक्षाचा विचार घरोघरी पोहोचवा : जयंत पाटील | पुढारी

पक्ष बळकटीसाठी राष्ट्रवादी पक्षाचा विचार घरोघरी पोहोचवा : जयंत पाटील

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष असून पक्ष बळकटीसाठी पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादीचा विचार घरोघरी पोहोचवावा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित परिवार संवाद यात्रेत ते बोलत होते. पाटील यांनी करवीर, कोल्हापूर दक्षिण आणि कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकार्‍यांशी मनमोकळा संवाद साधला. येथील शाहू स्मारकभवनात हा कार्यक्रम झाला.

पाटील म्हणाले, कार्यकर्त्यांनी आपल्या पदाच्या निवडीवर समाधान न मानता पक्ष बळकटीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. खानविलकर यांच्यानंतर आपण समर्थ नेतृत्व देऊ शकलो नाही. आपल्यातून सोडून गेलेले आणि नवीन तयार झालेल्या नेतृत्वामुळे दक्षिणमध्ये आपल्याला संधी नाही. पक्षासह हा परिस्थितीचाही दोष आहे.

पाटील म्हणाले, काँग्रेसच्या जयश्री जाधव यांच्या विजयात राष्ट्रवादीचा मोठा वाटा आहे. या ठिकाणी साम, दाम, दंड, भेद अशा सर्व पातळींवर लढणार्‍या भाजपचा मोठा पराभव करण्याचे मोठे काम झाले आहे. पक्ष कसा वाढेल, यावर कार्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे. बूथ स्तरावर कार्यकर्त्यांची बांधणी करून महागाईबाबत घराघरांत चर्चा झाली पाहिजे. संवाद साधल्याने आपुलकी वाढते, त्यातून पक्षवाढीस चालना मिळते.

तिन्ही मतदारसंघांतील पदाधिकार्‍यांनी भावना व्यक्त करताना या तिन्ही मतदारसंघांत आतापर्यंत काँग्रेस, शेकाप आणि शिवसेना या पक्षांना साथ दिली. या मतदारसंघांत आपल्या पक्षाचा उमेदवार नसल्याने पक्ष बळकटीसाठी मर्यादा येत असल्याचे सांगितले. तसेच करवीर आणि हातकणंगले या दोन्ही विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या तब्बल 22 जागा असूनही येथे राष्ट्रवादी काँग्रेसला प्रतिनिधित्व मिळत नसल्याने कार्यकर्त्यांत नाराजी असते, अशी खंत व्यक्त केली. भविष्यात जि. प., पंचायत समितीत पक्ष कार्यकर्त्यांना संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, परिवार संवाद यात्रेद्वारे कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील करीत आहेत. कार्यकर्त्यांनी सामान्यांची कामे करावीत, त्यासाठी ग्रामीण भागासह शहरात पक्ष कार्यालये स्थापन करा. परिवार संवाद यात्रेच्या समरोप समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आ. अरुण लाड, मेहबूब शेख, सुनील गव्हाणे, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, राजू लाटकर, आदिल फरास, जहिदा मुजावर यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.

Back to top button