कोल्हापूर : परदेशी गिफ्टची बतावणी; 50 लाखांची मागणी | पुढारी

कोल्हापूर : परदेशी गिफ्टची बतावणी; 50 लाखांची मागणी

कोल्हापूर ; गौरव डोंगरे : इन्स्टाग्रामवर आलेल्या एका मेसेजद्वारे महागडी अत्तरे, गोल्ड प्लेटेट दागिने स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून कोल्हापुरातील एका तरुणाकडून पहिल्यांदा कुरिअरचे पैसे उकळले. गिफ्ट भारतात आले असून, कस्टम ड्युुटीचे पैसे भरण्याची सूचना करण्यात आली. अव्वाच्या सव्वा पैशांची मागणी होऊ लागल्याने त्याने संपर्क थांबविला; पण समोरून धमकीचे फोन येऊन वस्तू न घेतल्यास 50 लाखांची कस्टम ड्युटी बसणार असल्याचे सांगताच तरुणाच्या पायाखालची वाळू सरकली.

ऑनलाईन खरेदी-विक्री व्यवहारातील फसवणुकीचे नवनवे फंडे दररोज समोर येत आहेत. सोशल मीडिया आणि मोबाईलच्या माध्यमातून सायबर गुन्हेगार घरबसल्या तुमच्या खात्यावर दरोडे घालत आहेत. बक्षिसांचे आमिष, एटीएम कार्ड बंद पडल्याची भीती, जुन्या वस्तू स्वस्तात खरेदीचे आमिष, बँक अधिकारी बोलत असल्याची बतावणी अशा या ना त्या कारणाने हॅकर्स आपल्या पैशावर डोळा ठेवून आहेत.

बोगस कुरिअर अन् डिलिव्हरी बॉय

कॅश ऑन डिलिव्हरीच्या नावाखाली नवा फ्रॉड समोर येत आहे. व्यक्तीला कॉल येतो आणि डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह बोलत असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डरबाबत पैसे मागितले जातात, पण तुम्ही काही ऑर्डरही केलेली नसते. तरीसुद्धा डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह पार्सल देऊन पैशांची मागणी करतो. तुम्ही घरी नसाल तर तुमच्या शेजारी फेक पार्सल डिलिव्हर करून त्यांच्याकडूनही पैसे घेतले जात असल्याचे दिसून येते.

कोल्हापूर मधील एका तरुणाने इन्स्टाग्रामवर पाहिलेल्या या वस्तूंची गळ घालून त्या भारतात पाठविल्याचे त्याला सांगण्यात आले. वस्तूंची 37 हजारांची कस्टम ड्युुटी भरण्याची सूचना करण्यात आली. मात्र, त्याने वस्तू नाकारताच तब्बल 50 लाखांचा दंड झाल्याचे सांगून त्याला दरडावण्यात येत होते.

Back to top button