इचलकरंजी : शतकानंतरही वारसास्थळांकडे दुर्लक्ष | पुढारी

इचलकरंजी : शतकानंतरही वारसास्थळांकडे दुर्लक्ष

इचलकरंजी : विठ्ठल बिरंजे

आपणसुद्धा एक माणूस आहोत, ही बहिष्कृत वर्गात चेतना जागृत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावलेल्या माणगाव परिषेदने नुकतेच शतक पूर्ण केले. मात्र, ही परिषद यशस्वी करण्यासाठी मोठे योगदान दिलेले माणगावचे सुपुत्र पोलिसपाटील आप्पासाहेब पाटील यांची समाधी आणि ज्या शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्काम केला ती शाळा, ही दोन ऐतिहासिक स्मारके शतकानंतरही दुर्लक्षित आहेत.  2016 ला 169 कोटींचा मूळ आराखडा मंजूर झाला. मात्र, त्यापैकी केवळ दोन कोटी रुपयेच दिले. निधी मिळण्याची अशीच गती राहिल्यास स्मारक पूर्णत्वाला कधी जाणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

…म्हणून माणगावची निवड

राजर्षी शाहू महाराज यांचा पाठिंबा आणि आप्पासाहेब पाटील यांचे अथक परिश्रम आणि नेटक्या नियोजनामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे बहिष्कृत समाजाची 21 व 22 मार्च 1920 ला परिषद पार पडली. माणगाव परिषदेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. राजर्षी शाहू महाराज यांनी ही परिषद केवळ करवीर संस्थानची होऊ नये याची दक्षता घेतली होती. म्हणूनच त्यांनी इचलकरंजी, सांगली, कुरुंदवाड आणि करवीर संस्थानच्या जवळपास मध्यवर्ती ठिकाण म्हणून माणगावची निवड केली. या परिषदेला स्वातंत्र्यलढ्याचीही किनार असल्याने इंग्रज सरकारचेही या परिषदेकडे बारीक लक्ष होते.

आप्पासाहेब पाटील यांचे योगदान अन् समाधीही दुर्लक्षित

राजर्षी शाहू महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आप्पासाहेब पाटील यांनी परिषदेची जबाबदारी उचलली. त्यांनी स्वत:च्या 110 एकरांतील दाणापाणी, अन्नधान्याचे कोठार परिषदेसाठी येणार्‍यांना खुले केले. मंडप व डेकोरेशन व्यवस्थेपासून बाबासाहेबांच्या निवासाच्या व्यवस्थेचे गावातील दहा ते बारा सहकार्‍यांच्या मदतीने नेटके नियोजन केले. परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या 15 ठरावांपैकी 13 नंबरचा ठराव आप्पासाहेब पाटील यांच्या अभिनंदनाचा होता. यावरून आप्पासाहेबांचे परिषदेतील योगदान अधोरेखित होते. 1927 ला आप्पासाहेबांचे निधन झाले. त्यांच्या आब्दागिरी नावाच्या शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्या ठिकाणची त्यांची समाधी सध्या भग्नावस्थेत आहे. प्रत्येक वर्षी माणगाव परिषदेचा जागर केला जातो. अनेक राजकीय व्यक्ती या ऐतिहासिक स्थळाला भेटी देतात. परंतु; ज्या आप्पासाहेबांनी माणगाव परिषदेचे शिवधनुष्य उचलले, त्यांच्या स्मृतिस्थळाकडे पाहायला कुणाला वेळच नाही.

संस्थानकालीन शाळेची पडझड

माणगाव परिषदेच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संस्थानकालीन शाळेत वास्तव्य केलेले होते. कागलचे जहागीरदार जयसिंगराव घाटगे यांनी ही शाळा उभारली. सध्या या इमारतीची दयनीय अवस्था झाली आहे. या शाळेचा मूळ ढाचा न बदलता संवर्धन होणे अपेक्षित आहे.

Back to top button