संत विचार जगभर पोहोचवा : राज्यपाल | पुढारी

संत विचार जगभर पोहोचवा : राज्यपाल

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : संतांनी विश्‍वबंधुत्वाचा, एकतेचा विचार सर्वत्र पोहोचवला. संत विचारांत विश्‍वकल्याणाची ताकद आहे. यामुळे संतांचे विचार जगभर पोहोचवा. संत साहित्याचे अध्ययन होणे गरजेचे आहे. त्याकरिता हे संत साहित्य संमेलन दिशादर्शक ठरेल, असा विश्‍वास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्‍त केला. महासैनिक दरबार हॉल येथे मंगळवारी पहिले विश्‍वात्मक संत साहित्य संमेलनाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

या संमेलनाचे उद्घाटन संमेलनाध्यक्ष ह. भ. प. न्या. डॉ. मदन महाराज गोसावी व स्वागताध्यक्ष संत साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. सदानंद मोरे यांच्या उपस्थितीत झाले.

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. ती ओळख कायम ठेवा. ते तुमच्याच हातात आहे, असे सांगत राज्यपाल कोश्यारी म्हणाले, संपूर्ण जग हे एक कुटुंब असल्याची, सारे विश्‍वच हे आपले घर असल्याची शिकवण संतांनी दिली. मी सर्वात आहे, सर्वजण माझ्यात आहेत, अशी सर्वांना सुखी ठेवणारी, एकसमान मानणारी भावना संतांची होती. त्यांची भाषा वेगवेगळी होती. मात्र सार्‍यांचे मानव कल्याणाचे भाव एकच होते. साधू-संतांनी हाच भाव संपूर्ण देशभर नेला. आपण मात्र त्यापासून दूर जात आहोत. मी आणि माझे अशाच नात्यात आपण गुंतलो आहोत, असे ते म्हणाले.

संतांची शिकवण मार्गदर्शक ः डॉ. गोसावी

संमेलनाध्यक्ष डॉ. गोसावी म्हणाले, संपूर्ण जगाचे वर्तमान कोरोनाच्या महामारीने अस्वस्थ आहे. असुरक्षित आहे, चिंतातूर आहे. अशा तणावपूर्ण आणि चिंताग्रस्त वातावरणात समाजाला योग्य दिशा देण्याचे काम संतांचे विचार करू शकतात. हे विचार तत्त्वज्ञान शाश्‍वत आणि चिरंतन असे आहे. संपूर्ण विश्‍वशांतीसाठी संतांची शिकवण आजही मार्गदर्शक ठरत आहे.

‘हे विश्‍वची माझे घर’ असे म्हणणारे संत किंवा ‘वसुधैव कुटुंबकम’ अशी त्यांची शिकवण देणारी आमची समृद्ध परंपरा हेच आमचे सांस्कृतिक संचित आहे.

यावेळी ‘उजळावया आलो वाटा’ या संपादित ग्रंथाचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. वारकरी पगडी, उपरणे आणि विठ्ठल-रखुमाईची मूर्ती देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

शंतनू हेर्लेकर, उपग्‍ना पंड्या यांनी ‘ओम नमोजी आद्या’ गीताचे सादरीकरण केले. डॉ. समीरा गुजर यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ आणि सांगता करण्यात आली. उद्घाटन सोहळ्यासाठी लोक साहित्याचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे, डॉ. रामचंद्र देखणे, डॉ. सुहास बहुलकर, डॉ. अरुणा ढेरेे, बी. डी. कुलकर्णी, जगन्‍नाथ पाटील, मोहन गोस्वामी, सौ. सविता गोसावी आदींसह देशभरातील विविध ठिकाणांहून आलेले महंत, मठाधिपती, प्रवर्चनकार, विविध क्षेत्रांतील मान्यवर, वारकरी संप्रदायातील लोक उपस्थित होते.

पंढरपूरच्या वारीचे जगालाही आश्‍चर्य

संतांची साधना मोठी आहे. सारे लोक ईश्‍वराची लेकरे आहेत, ही भावना सर्वसामान्यांच्या मनात संतांनी रुजवली. जगाला आश्‍चर्य वाटावे, अशी पंढरपूर येथे वारी होत आहे. या वारीतून संतांनी सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला आहे, असे राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले.

संमेलनासाठी पाच लाखांची देणगी

विश्‍वाच्या कल्याणासाठी संतांचे विचार, आचार, साहित्य सर्वांसमोर यावे, यासाठी हे साहित्य संमेलन आयोजित केले आहे. या पहिल्या विश्‍वात्मक संत साहित्य संमेलनास शुभेच्छा देऊन यासाठी पाच लाख रुपये मदत देत असल्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी जाहीर केले.

Back to top button