राजू शेट्टी… संसद ते पुन्हा शिवार | पुढारी

राजू शेट्टी... संसद ते पुन्हा शिवार

कोल्हापूर; चंद्रशेखर माताडे : जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वाची मुदत संपण्यापूूर्वीच आमदार… आमदार म्हणून मुदत संपण्यापूर्वीच खासदार… त्यानंतर पुन्हा एकदा खासदार म्हणून यश… या सार्‍या यशाच्या पायर्‍या चढताना कुठे काय चुकले, हे शेट्टी यांना कळलेच नाही व लोकसभेला पराभव झाला. दुसर्‍यांदा लोकसभेची निवडणूक लढविताना भाजपचा पाठिंबा घेऊन ते खासदार झाले. तिसर्‍यांदा लोकसभा लढविताना महाविकास आघाडीचा पाठिंबा घेतला; पण पराभवाचा झटका बसला. शिवार ते संसद प्रवास करणार्‍या राजू शेट्टींचा संसद ते शिवार प्रवास का झाला? याचे उत्तर दुसर्‍या कोणाला नाही तर ते शेट्टी यांनाच शोधायचे आहे. संघटना बांधणीचेे आव्हानही आता त्यांच्यासमोर आहे.

राजू शेट्टी यांचा चढता प्रवास अचानक थांबला नाही, तर त्याची चुणूक 2014 च्या विधानसभा निवडणुकीत दिसली होती. राजू शेट्टी यांचे उमेदवार शिरोळ या स्वााभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या मतदारसंघात पराभूत झाले. तर शेट्टी यांचेच एकेकाळचे खंदे शिलेदार उल्हास पाटील विजयी झाले.

या निवडणुकीला वेगळी किनार होती; पण राजू शेट्टी यांच्यासाठी हा धोक्याचा इशारा होता. पुढे दानोळी येथून पाणी योेजनेला विरोध केल्याने इचलकरंजीकरांचा रोषाचा त्यांना सामना करावा लागला. हे सगळे त्यांच्यासाठी धोक्याचे इशारे होते. मात्र, याकडे झालेल्या दुर्लक्षाने त्यांना माजी खासदार केले. संघटना पातळीवरही बांधणीकडे संघटनेतील नाराजीकडे त्यांचे दुर्लक्ष झालेच होते.

देश पातळीवर शेतकर्‍यांचे नेतृत्व करण्याची चाचपणी करण्याच्या नादात मतदारसंघ हातातून कधी निसटला हे शेट्टी यांना पराभवानंतरच समजले. कधी भाजप, कधी महाविकास आघाडी, असा उलटासुलटा प्रवासही मतदारांना रुचला नसावा. मात्र, आता महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. आता पुन्हा ते शेतकर्‍यांसमोर जाणार आहेत. म्हणजे शिवार ते संसद यातून पुन्हा ते शिवारात आले आहेत. आता त्यांना पुन्हा संघटनेची बांधणी करावी लागेल.

आपले सहकारी आपल्याला सोडून का गेले? याचा विचार शेट्टी नक्‍कीच करतील. सदाभाऊ खोत संघटनेतून बाहेर गेले. रविकांत तुपकरही बाहेर गेल्यावर त्यांना परत आणावे लागले, हे सगळे का घडले? संघटनेच्या उभारणीत नेमके कुठे दुर्लक्ष झाले? याची कारण शोधावीच लागतील. त्याचबरोबर आता नव्याने संघटना बांधणीचे आव्हान पेलावे लागणार आहे.

प्रश्‍नांना भिडणार्‍या नेतृत्वाची गरज

एफआरपीचे तुकडे पाडले, दुधाला एफआरपी देण्याची घोषणा झाली; पण पुढे काय? असे अनेक प्रश्‍न शेतकर्‍यांसमोर आहेत. शेतीमालाला हमीभाव मिळण्याचा प्रश्‍न आहे. खतांची टंचाई, काळाबाजार, बनावट बियाण्यांसह पाण्याच्या उपलब्धतेचे प्रश्‍न आहेत. या सगळ्या प्रश्‍नांना भिडणार्‍या नेतृत्वाची शेतकर्‍यांना गरज आहे. प्रश्‍न आहे तो शिवाराचे प्रश्‍न उठविण्याचा. शिवारातून हे प्रश्‍न किती ताकदीने राजू शेट्टी उठविणार, त्यावर बरेच काही अवलंबून आहे.

Back to top button