शाहू विचारांना विरोध करणार्‍या भाजपला पराभूत करा : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात | पुढारी

शाहू विचारांना विरोध करणार्‍या भाजपला पराभूत करा : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : राजर्षी शाहूंच्या विचारांना विरोध करणार्‍या भाजपला तीन पक्षांनी एकत्र येऊन आम्ही सत्तेपासून दूर ठेवले आहे. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत तुम्ही आम्हाला साथ द्या. राजर्षींच्या विचारांना विरोध असणार्‍यांना त्यांची जागा दाखवा आणि महाविकास आघाडी भक्कम करा, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी केले.

महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ मिरजकर तिकटी येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. चंद्रकांत जाधव यांचे अपुरे राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी जयश्री जाधव यांना विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले

महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा भाजपच्या वतीने सातत्याने प्रयत्न केला जातो. परंतु, सरकार पाडण्यासाठी जेवढे प्रयत्न करतील तेवढी महाविकास आघाडी अधिक भक्कम होईल, असा विश्वास व्यक्त करत थोरात म्हणाले, काँग्रेसच्या काळात महागाईच्या नावाखाली ऊठसूट रस्त्यावर उतरणारे भाजपचे कार्यकर्ते आज महागाईचा आगडोंब उसळला असताना कोठे लपून बसले आहेत? याचा जाब मूळ गाव सोडून पुण्याला गेलेल्या चंद्रकांत पाटील यांना विचारावा.

महाविकास आघाडी सरकार एक-दोन महिन्यांत पडेल, असे त्यांना वाटत होते. त्यानंतर भाजपने सरकार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. रोज एक नवीन मुहूर्त शोधू लागले. सरकार पाडण्यासाठी केंद्रीय संस्थांचा वापर करून छापे टाकण्यात येत आहेत. कार्यकर्त्यांच्या कुटुंबांनादेखील त्रास दिला जात आहे. परंतु, त्यांनी काही केले तरी महाविकास आघाडीचे सरकार यापुढेही अधिक मजबुतीने काम करेल.
चंद्रकांत जाधव यांची सामान्य माणसाशी नाळ कायम राहिली. तळमळीचा कार्यकर्ता अचानकपणे आपल्यातून निघून गेला. त्यांचे राहिलेले अपूर्ण काम पुढे नेण्यासाठी जयश्री जाधव यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहावे. त्यांना निवडून देऊन महाविकास आघाडीचा 171 चा आकडा कायम ठेवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. जाधव यांना बिनविरोध करून भाजपने मोठे मन दाखवावयास हवे होते; पण त्यांनी ते दाखविले नाही. समतेचा संदेश देणार्‍या राजर्षी शाहूंचे विचार नाकारणार्‍या भाजपला कोल्हापूरची जनता जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.

धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न

संपूर्ण केंद्रीय यंत्रणा हाताशी धरून खुनशी प्रवृत्तीने समोरच्याला संपविण्याचा प्रयत्न भाजप करत आहेत. दहशतवाद्यांसाठी वापरण्यात येणार कायदे विरोधी राजकीय कार्यकर्त्यांना अडकविण्यासाठी वापरण्यात येत आहेत, असा घणाघात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केला. ते म्हणाले, समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण केल्याशिवाय आपण टिकू शकत नाही हे भाजपच्या लक्षात आल्यामुळे भावनांना हेलकावे देण्याचा प्रयत्न ते करत आहेत. हे दुर्दैवी आहे. ज्याच्याकडे निर्णय मागायला जायचे तोच आज अन्याय करत आहे. स्वतंत्रपणे सत्तेत येऊ शकत नाही, हे भाजपला माहीत असल्यामुळे एमआयएमसारख्या पक्षांना हाताशी धरून त्यांचा वापर सत्तेसाठी करून घेत आहेत. समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणार्‍या या प्रवृत्तीला आपण रोखले पाहिजे. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र आल्याने भाजपची धूळदाण होत आहे.

महाविकास आघाडीमध्ये भांडणे लावण्याचा भाजपने खूप प्रयत्न केला; परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. महाराष्ट्रात आज कोरोनाच्या अडचणीच्या काळातदेखील महाविकास आघाडीने चांगले काम केले आहे. हे केंद्रीय सरकारने केलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या निवडणुकीत जाधव यांना साथ द्यावी, असे आवाहन केले.

तुम्हाला कोल्हापुरात येऊन मते मागण्याचा काय अधिकार : ना. पाटील

कोल्हापुरात निवडणूक लढवायला मतदारसंघ मिळाला नाही. सगळीकडेच पराभव दिसू लागल्याने पुण्याला पळून गेलेले चंद्रकांत पाटील कोल्हापुरात येऊन भाजपसाठी कोणत्या तोंडाने मते मागत आहेत, असा थेट सवाल पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला. कोल्हापुरात कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची याचा सर्व्हे तुम्ही केला; पण तुमची डाळ काही शिजली नाही म्हणून ही डाळ तुम्ही पुण्याला घेऊन गेलात. त्यामुळे कोल्हापुरात येऊन मते मागण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले.

थेट पाईपलाईनला भाजपचे अडथळे : ना. मुश्रीफ

थेट पाईपलाईनच्या कामात अडथळे आणण्याचे काम भाजपच्या पाच वर्षांच्या काळात सर्वाधिक झाल्याने हे काम रखडल्याचा आरोप कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. जेव्हा हे काम प्रगतिपथावर होते तेव्हा राज्यात भाजप सत्तेवर आले, तेव्हा झाडे तोडण्याला विरोध केला गेला. नंतर कोरोना काळात आमच्याकडून काम थांबले. यात आमचा काही दोष नाही.

महाविकास आघाडीची ताकद दाखवा : ना. उदय सामंत

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले, महाविकास आघाडीची ताकद काय आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून देण्याची गरज आहे. या निवडणुकीत पुण्यातील 3 लाख भाजप कार्यकर्ते कोल्हापुरात प्रचारासाठी येणार असल्याची चर्चा आहे. 3 लाख काय; पण पूर्ण भारतातील भाजप कार्यकर्ते आले तरी जयश्री जाधव यांचा विजय कोणी रोखू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपने गद्दारी केली : क्षीरसागर

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, काँग्रेस पक्षाविरोधात आमची थेट लढाई होती तेव्हा भाजप आमच्यासोबत असूनही आमच्या पाठीत खंजीर खुपसला. तुम्ही गद्दार आहात हे या निवडणुकीत प्रत्येक शिवसैनिकाला पटवून सांगितले आहे. खासदार संजय मंडलिक यांनी मविआ उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले.

महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव म्हणाल्या, मी बिचारी नाही तर सक्षम आहे म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहे. माजी आमदार मालोजीराजे यांनी भाजपकडून जाती-पातीचे राजकारण केले जात असल्याचे सांगितले. यावेळी भारती पोवार, विजय देवणे, आदिल फरास, सोमनाथ घोडेराव यांची भाषणे झाली.

सभेला आ. पी. एन. पाटील, आ. संग्राम थोपटे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आर. के. पोवार, काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण, शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारुगले, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे आदी उपस्थित
होते.

तुम्ही त्रास दिला म्हणून चंद्रकांत पाटील पुण्याला गेले

चंद्रकांत पाटील यांच्यावर मी काही बोलणार नाही. महाराष्ट्राला त्यांची गरज आहे. ते भाजपचे जास्त काळ प्रदेश अध्यक्ष होणे आवश्यक आहे. आपल्या सोयीचा माणूस भाजपच्या प्रदेश अध्यक्षपदी असेल, तर सतेज पाटील तुम्हाला काय अडचण आहे? तुम्ही सगळ्यांनी त्रास दिला म्हणून ते पुण्याला गेले. आता मला दुसरे पॅकेज सांगलीला घेऊन जायला कुणी तरी भाषणात सांगितले आहे. ते नंतर पाहू, असे जयंत पाटील म्हणाले.

Back to top button