गाय-म्हैस दूध खरेदी दरात २ रुपयांची वाढ | पुढारी

गाय-म्हैस दूध खरेदी दरात २ रुपयांची वाढ

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : गाय व म्हैस दूध खरेदी दरामध्ये प्रतिलिटर 2 रुपये वाढ करण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) संचालक मंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. अध्यक्षस्थानी विश्वास पाटील होते. दहा महिन्यांत दूध उत्पादकांना ‘गोकुळ’ने ही दुसर्‍यांदा वाढ दिली असून, त्याची अंमलबजावणी दि. 1 एप्रिलपासून होणार आहे. या दरवाढीमुळे म्हशीच्या 6 फॅट व 9 एस.एन.एफ.करिता 43 रुपये 50 पैसे प्रतिलिटर दर मिळणार आहे. हाच दर पूर्वी 41 रुपये 50 पैसे इतका होता. गायीच्या दुधासाठी 3.5 फॅट व 8.5 एस.एन.एफ.करिता 27 रुपयांवरून आता प्रतिलिटर 29 रुपये दर मिळणार असल्याचे विश्वास पाटील यांनी सांगितले.

नवीन संचालक मंडळाने दहा महिन्यांत दूध खरेदी दरात ही दुसरी वाढ केली आहे. यापूर्वी म्हैस दुधासाठी 2 रुपये, तर गायीच्या दुधासाठी प्रतिलिटर 1 रुपया दूध खरेदी दरात वाढ केली होती. यामुळे दहा महिन्यांत म्हैस दूध खरेदी दरात 4 रुपये व गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची वाढ दूध उत्पादकांना दिली आहे. दूध उत्पादकांना गुढीपाडव्याची ही भेट असल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

पाच लाख दूध उत्पादकांना दररोज 28 लाख रुपयांचा लाभ

‘गोकुळ’चे दररोजचे दूध संकलन 14 लाख लिटर आहे. या दरवाढीनेे पाच लाख दूध उत्पादकांना दररोज 28 लाख रुपये जादा मिळणार आहेत.

Back to top button