कोल्हापूर-बंगळूर विमानसेवाही बंद | पुढारी

कोल्हापूर-बंगळूर विमानसेवाही बंद

कोल्हापूर; अनिल देशमुख : प्रवाशांचा अत्यंत चांगला प्रतिसाद असलेली कोल्हापूर-बंगळूर विमानसेवा बंद करण्यात आली आहे. मुंबई, अहमदाबाद पाठोपाठ आता बंगळूरचीही कोल्हापूरशी असलेली ‘एअर कनेक्टिव्हिटी’ खंडित झाली. नव्या मार्गावर विमानसेवा सुरू होण्याऐवजी आहे त्या मार्गांवरील सेवा बंद होत आहेत. एरव्ही विकासाच्या गप्पा मारणार्‍यांना हे विदारक चित्र दिसत नाही का? कोल्हापूरच्या विकासासाठी खमक्या नेता कोणी नाही का? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.

कोल्हापूर-बंगळूर मार्गावर दि. 9 डिसेंबर 2018 पासून विमानसेवा सुरू झाली. दररोजच्या सेवेमुळे भविष्यात या मार्गावर आणखी सेवा विस्तारेल, असे चित्र होते. मात्र, चांगल्या पद्धतीने सुरू असलेली ही सेवा दि. 27 मार्चपासून बंद झाली आहे.

कोल्हापूर-बंगळूर मार्गावर आरसीएस-उडान (रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम) योजनेतून अलायन्स एअरची सेवा होती. यासाठी तीन वर्षांचा करार होता. याद्वारे विमान कंपनीला इंधन आणि विमानतळ वापराच्या शुल्कात सवलत मिळत होती. हा कालावधी संपल्याने ही सेवा बंद झाल्याचे सांगण्यात येते.

कोल्हापूर-मुंबई मार्गावरील विमानसेवा सध्या बंदच आहे. कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवेलाही प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिला. मात्र, ही सेवा अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. यापाठोपाठ आता बंगळूरची सेवाही बंद झाली आहे. दरम्यान, कोल्हापूर-अहमदाबाद या मार्गावर जूनपासून सेवा सुरू होईल, असे सांगण्यात येत आहे.

Back to top button