कोल्हापूर : व्यापार्‍याचा 15 लाखांसाठी अपहरणाचा संशय | पुढारी

कोल्हापूर : व्यापार्‍याचा 15 लाखांसाठी अपहरणाचा संशय

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : हातकणंगले येथील बेपत्ता टिंबर व्यापारी दीपक हिरालाल पटेल (वय 34) याचे 15 लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी हातकणंगले पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

पोलिस पथकांनी तपास सुरू केला आहे. अपहरणाचा प्रकार तीन दिवसांपूर्वी होऊनही हातकणंगले पोलिसांनी याबाबत कमालीची गोपनीयता पाळली आहे. व्यापार्‍याचे भाऊ राहुल पटेल यांनी दोन दिवसांपूर्वी हातकणंगले पोलिसांत अनोळखी व्यक्तीविरुद्ध फिर्याद दिली आहे.

व्यापारी दीपक हा शनिवारी (दि. 26) दिवसभर वखारीत काम करीत होता. परंतु, रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही. नातेवाईकांनी दीपक बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली. दीपक बेपत्ता नसून, त्याचे अपहरण झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे; कारण दीपकला बिटकॉईन या आभासी चलनात बर्‍यापैकी रक्कम मिळाल्याचे समजते. त्यातूनच त्याचे पैशांकरिता अपहरण झाल्याचा संशय बळावला आहे.

पोलिस उपअधीक्षक रामेश्वर वैंजणे, पोलिस निरीक्षक के. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके कर्नाटकात रवाना झाली आहेत. बेपत्ता दीपकची मोटारसायकल पट्टण कोडोलीत (ता. हातकणंगले) सापडली आहे. तसेच दीपकला मोबाईलवरून संपर्क साधला असता पहिल्यांदा लोकेशन साजणीत व नंतर सदलगा, कर्नाटक येथे सापडल्याचे समजते. पोलिसांनी कसून शोधमोहीम सुरू केली आहे.

Back to top button