पोलिसाच्या पत्नीचे 27 तोळे दागिने चोरीस | पुढारी

पोलिसाच्या पत्नीचे 27 तोळे दागिने चोरीस

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

मध्यवर्ती बस स्थानक (सीबीएस) ते खेबवडे (ता. करवीर) प्रवासादरम्यान महिलेची 27 तोळे दागिन्यांची पर्स अज्ञाताने रिक्षातून चोरून नेली. याबाबत गायत्री मिथुन भाट (वय 29, रा. बोरिवली) यांनी शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादी यांचे पती मालाड (मुंबई) पोलिस स्टेशनमध्ये कॉन्स्टेबल आहेत.

गायत्री भाट यांचे माहेर करवीर तालुक्यातील खेबवडे येथे आहे. माहेरी यात्रा असल्याने त्या शनिवारी कोल्हापूरला आल्या. मध्यवर्ती बसस्थानक येथे त्यांचा भाऊ ओंकार त्यांना घेण्यासाठी आला. त्यांनी एका ओळखीच्या रिक्षाचालकाला याठिकाणी बोलावले. यानंतर ते मध्यवर्ती बसस्थानक येथून खेबवडे गावी निघाले. या दरम्यान उद्यमनगर येथील बेकरीत, वाय. पी. पोवारनगर येथे खरेदी करून पाचगाव, गिरगावमार्गे त्या खेबवडे येथे पोहोचल्या. यावेळी त्यांना सोन्याचे दागिने ठेवलेली बॅग गायब असल्याचे लक्षात आले.

उद्यमनगर सोडल्यानंतर चोरी

फिर्यादी गायत्री भाट भाऊ ओंकार याच्यासोबत दुचाकीवरून पुन्हा यामार्गे बॅगेचा शोध घेत आल्या. उद्यमनगरातील बेकरीमध्ये येऊन त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता याठिकाणी बॅग असल्याचे दिसून आले. यानंतरच ही चोरी झाल्याचे स्पष्ट झाले.

Back to top button