कोल्हापूर उत्तर विधानसभा : जिल्ह्यात भाजप खाते उघडणार का? | पुढारी

कोल्हापूर उत्तर विधानसभा : जिल्ह्यात भाजप खाते उघडणार का?

कोल्हापूर ; सतीश सरीकर : सहकाराने व्यापलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात भाजपने कार्यकर्त्यांची काही प्रमाणात ताकद निर्माण केली आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत समिती, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिकेतही भाजपने एंट्री केली आहे. काही ठिकाणी स्वबळावर सत्ता मिळविली आहे. विधानसभेत मात्र भाजपला मिळालेले यश राखता आलेले नाही. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांपैकी एकाही ठिकाणी भाजपचा आमदार नाही.

सध्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजपला पुन्हा एकदा खाते उघडण्याची संधी आली आहे. आता तरी भाजप खाते उघडणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. जिल्ह्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणार्‍या या निवडणुकीत भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

गेल्या काही वर्षापर्यंत जिल्ह्यावर काँग्रेसचे राजकीय वर्चस्व होते. कालांतराने काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादीची स्थापना झाली. त्यामुळे जिल्ह्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिला. त्यानंतर जिल्ह्याची राजकीय हवा बदलू लागली आहे. 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून सुरेश हाळवणकर यांनी पहिल्यांदा भाजपकडून विजय मिळवून दिला. काँग्रेस-राष्ट्रवादीला मानणार्‍या जिल्ह्यात 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने करिष्मा करत सहा आमदार निवडून आणले.

त्यांच्यासोबत भाजपनेही आपला विस्तार सुरू केला. भाजपचेही दोन आमदार कोल्हापूरकरांनी विधानसभेत पाठविले होते. यात हाळवणकर यांच्याबरोबरच अमल महाडिक यांचा समावेश होता. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दोन्ही आमदारांचा पराभव झाला. शिवसेनेच्याही पाच आमदारांना पराभवाची झळ बसली. सद्य:स्थितीत शिवसेनेचे एकमेव प्रकाश आबिटकर हे आमदार आहेत.

काँग्रेसचे आ. चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनाने कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक लागली आहे. काँग्रेसच्या वतीने जाधव यांच्या पत्नी, माजी नगरसेविका श्रीमती जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने माजी नगरसेवक सत्यजित कदम यांना रिंगणात उतरवले आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी काटाजोड लढत होत आहे.

राजकीय वातावरण तापले आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. महाविकास आघाडीकडून काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेची राज्य पातळीवरील नेतेमंडळी, मंत्री यांना प्रचारासाठी उतरविण्यात येणार आहे. भाजपकडूनही राज्यातील नेत्यांना कोल्हापुरात महाविकास आघाडीविरुद्ध प्रचाराच्या तोफा डागण्यासाठी रणांगणात उतरविले जाणार आहे.

काँग्रेसचे कमबॅक!

2014-2019 मधील विधानसभेत कोल्हापूर जिल्ह्यातील एकही काँग्रेसचा आमदार नव्हता. जिल्ह्यात काँग्रेस आमदारांची संख्या शून्य होती. परंतु पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे जिल्ह्यातील काँग्रेसची सूत्रे आल्यानंतर 2019 मध्ये चार आमदार निवडून आले. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था व शिक्षक मतदारसंघावरही काँग्रेसचे वर्चस्व आहे.

Back to top button