‘सारथी’ उपकेंद्रावर सोमवारी मराठा महासंघाचे आंदोलन | पुढारी

‘सारथी’ उपकेंद्रावर सोमवारी मराठा महासंघाचे आंदोलन

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

‘सारथी’ कोल्हापूर उपकेंद्राच्या संथ कारभाराला गती मिळावी, मराठा-बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि पाठबळ देणार्‍या योजना त्यांनी तातडीने राबवाव्यात, यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने सोमवारी (दि. 28) ‘सारथी’च्या उपकेंद्रासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

यावेळी ‘सारथी’च्या निर्मितीचा अहवाल वाजत-गाजत अधिकार्‍यांना देऊन त्यानुसार कृती करा, असेे आवाहन करण्यात येणार आहे. त्याचा 15 दिवसांत विचार न झाल्यास ‘सारथी’च्या अधिकार्‍यांच्या घरांवर मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला.

केवळ दोन योजना सुरू

सारथी’ उपकेंद्रामार्फत स्थानिक पातळीवर सध्या केवळ फेलोशिप व स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती या दोन योजना वगळता इतर सर्व योजना बंद असल्याचे महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी सांगितले.

राजर्षींच्या स्मृतिशताब्दीनिमित्त ‘सारथी’च्या माध्यमातून मराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. येत्या दोन महिन्यांत किमान 50 हजार विद्यार्थ्यांना विविध विषयांचे प्रशिक्षण द्यावे. सध्याच्या अहवालात त्याची माहिती असताना ‘व्हिजन डॉक्युमेंट’च्या नावाखाली तेच काम करून मराठा समाजाची चेष्टा करण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप कोंढरे यांनी केला. यावेळी शशिकांत पाटील, शैलजा भोसले, उत्तम जाधव, शंकरराव शेळके, सरदार पाटील उपस्थित होते.

Back to top button