शिवसेना पक्षप्रमुखांचा आदेश मानून काम करणार : राजेश क्षीरसागर | पुढारी

शिवसेना पक्षप्रमुखांचा आदेश मानून काम करणार : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निष्ठावंत शिवसैनिक आहे. पक्षप्रमुखांचा आदेश मानून काम करत राहणार आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघ काँग्रेसला सोडल्याने कार्यकर्ते नाराज असून, त्यांची समजूत काढायला वेळ जाईल. निवडणूक तिरंगी झाली असती तर विजय निश्‍चित होता. तेव्हा काँग्रेसला शिवसेनेची शहरातील ताकद दिसून आली असती. मात्र, महाविकास आघाडीचे धोरण व पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार काँग्रेसचा उमेदवार ताकदीने निवडून आणण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रविवारी सायंकाळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. क्षीरसागर म्हणाले, कोल्हापूर उत्तर हा शिवसेनेचा बालेकिल्‍ला आहे. ज्या काँग्रेसने शिवसेनेचे पाच आमदार पाडले, त्यांच्यासाठी ही जागा सोडावी लागते याचे दु:ख होत आहे. 2019 च्या निवडणुकीत मतदारांमध्ये गैरसमज पसरविला गेला. काँग्रेस-राष्ट्रवादी व भाजपच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा असणार्‍या नेत्यांनी मी निवडून आलो तर जिल्ह्याचा पालकमंत्री होईन. जिल्ह्यात सर्वच ठिकाणी शिवसेना सत्ता काबीज करेल, या भीतीने निवडणुकीत खोट्या पद्धतीने माझा पराभव केला.

माजी आमदार असतानाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्षपद देऊन सन्मान केला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना-भाजप युती झाली. कोल्हापुरातून सहा आमदार निवडून आले. त्यावेळी आपणास मंत्रिपद दिले असते तर 2019 ला सहाचे आठ आमदार निवडून आणले असते, असे क्षीरसागर म्हणाले.

निवडणुकीतील पराभवानंतर न डगमगता शहराच्या विकासासाठी 237 कोटी रुपयांचा निधी आणला. शिवसेनेकडून कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक लढवावी, असा कार्यकर्ते, मतदारांचा आग्रह होता. कोल्हापूर उत्तरची निवडणूक काँग्रेस जिंकू शकत नाही म्हणून शिवसेनेने ही जागा लढवावी, अशी भूमिका शिवसेनेच्या मेळाव्यात आजी-माजी आमदार, संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख यांनी मांडली. एक्झिट पोलनुसार शिवसेना तिरंगी, एकाकी लढली असती तरी विजय निश्‍चित होता, असे क्षीरसागर म्हणाले.

पोटनिवडणुकीत हा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा लागतो, याचे कार्यकर्त्यांना मोठे दु:ख आहे. याची पक्षप्रमुखांना माहिती आहे. गेल्या काही दिवसांत शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षवाढीसाठी कमी पडत आहेत.

पुढील काळात कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी काम केले पाहिजे. येणार्‍या महापालिकेच्या निवडणूकीत शिवसेनेचा भगवा फडकवून पहिला महापौर निवडून आणणार आहे. महाविकास आघाडीच्या धोरणानुसार कोल्हापूर उत्तरची जागा काँग्रेसला सोडावी लागत असली तरी 2024 च्या निवडणूकीत शिवसेना पुन्हा ताकदीने लढेल. कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा. जिल्हा परिषद, महापालिकेच्या सर्व संस्थांवर भगवा फडकावायाचा असेल तर पक्षबांधणीसाठी जिद्दीने कामाला लागावे, असे आवाहन क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांना केले.

संपर्क प्रमुख, संपर्क मंत्री पक्षप्रमुखांना पटवून देण्यात कमी पडले

जिल्हा बँक निवडणूकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची भाजपची युती होत असेल कोल्हापूर उत्तर मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला पाहिजे, हे शिवसेना पक्षप्रमुखांना संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, संपर्कमंत्री उदय सामंत यांनी पटवून देणे आवश्यक होते. मात्र, तसे घडले नाही हे माझे दुर्देव समजतो, अशी खंत क्षीरसागर यांनी व्यक्‍त केली.

काँग्रेस-राष्ट्रवादीची दुटप्पी भूमिका

काँग्रेस-राष्ट्रवादी नाण्याच्या दोन बाजू आहेत. गरज असली की, शिवसेनेशी युती करतात. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांमध्ये त्यांना युती नको आहे. अशा दुटप्पी भूमिकेने काँग्रेस-राष्ट्रवादी वागत आहे. त्यामुळे खर्‍या शिवसैनिकांना न्याय कधी मिळणार? असा सवाल क्षीरसागर यांनी यावेळी उपस्थित केला.

जिल्हा बँक निवडणुकीत का डावलले?

महाविकास आघाडीची स्थापना झाल्यावर तीन पक्ष एकत्र आले. भाजपशी कोणताही संबंध ठेवायचा नाही, असे ठरले असताना काँग्रेस-राष्ट्रवादीने स्वत:च्या सोयीनुसार जिल्हा बँक निवडणुकीत भाजपशी युती करून शिवसेनेला का डावलले? याचे उत्तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना द्यावे, असा टोला क्षीरसागर यांनी लगावला.

शिवसेना कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना

कोल्हापूर उत्तर मतदारसंघ काँग्रेसला सोडावा लागल्याने शिवसेना नाराज कार्यकर्ते रविवारी सायंकाळी क्षीरसागर यांच्या घरासमोर एकत्र जमले. त्यांनी ‘उत्तर’चं उत्तर भगवं उत्तर’, ‘एकदाच घुमणार भगवा दिसणार’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दांत भावना व्यक्‍त केल्या. हुकूमशाही वृत्ती मोडून काढत शिवसैनिकांवरील अन्याय दूर करावा. राजेश क्षीरसागर यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला.

Back to top button