उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कुंभार गल्लीतील ‘एफएसआय’ वाढीसाठी प्रयत्न करा | पुढारी

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कुंभार गल्लीतील ‘एफएसआय’ वाढीसाठी प्रयत्न करा

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कुंभार गल्लीतील ‘एफएसआय’ वाढीसाठी प्रयत्न करण्याच्या सुचना कोल्हापूर महापालिकेला दिल्या.

शाहूपुरी कुंभार गल्ली परिसरात दरवर्षी पुराचे पाणी येते. त्यामुळे कुंभार समाज व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यावर उपाययोजना म्हणून टाऊन प्लॅनिंगमध्ये विशेष बाब म्हणून या परिसरातील घरांच्या बांधकामाचा ‘एफएसआय’ वाढवून देण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांना केल्या.

शाहूपुरी कुंभार गल्लीतील पूरग्रस्त भागाची पाहणी उपमुख्यमंत्री पवार यांनी मंगळवारी सकाळी केली. यावेळी कुंभार व्यावसायिकांसह व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्र्यांसमोर आपल्या व्यथा मांडल्या. गेल्या तीन वर्षांपासून पूर व कोरोनामुळे झालेल्या नुकसानीतून बाहेर पडण्यासाठी भरघोस मदतीची मागणीही त्यांनी यावेळी केली.

यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलिसप्रमुख शैलेश बलकवडे, आयुक्त डॉ. बलकवडे आदी उपस्थित होते.

कायमस्वरूपी उपाययोजना करा

कुंभार समाजाचे प्रतिनिधी उदय कुंभार, अमर समर्थ, पूजा नाईकनवरे व स्वप्नील नाईकनवरे यांनी शाहूपुरी, कुंभार गल्लीत दरवर्षी येणार्‍या पुरामुळे होणारे नुकसान रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली. ओढ्याकाठच्या घरांची उंची वाढविण्यासाठी एफएसआय वाढवून द्यावा, महापालिकेने बांधकामाची प्लॅन मंजुरी अत्यल्प दरात करून द्यावी, बांधकामासह व्यवसायासाठी कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून द्यावे आदी मागण्या केल्या. यावर उपमुख्यमंत्र्यांनी विशेष बाब म्हणून एफएसआय वाढीसाठी प्रयत्न करा, अशी सूचना आयुक्तांना केली; तर कर्जासंदर्भात बँकांशी चर्चा करण्याचे आश्वासनही दिले.

पाचव्या स्टेजमध्ये व्यापार्‍यांना सूट देता येईल

सन 2019 च्या महापुरापाठोपाठ 2020 मध्ये कोरोना आणि 2021 मध्ये पुन्हा महापूर आला. यामुळे सलग तीन वर्षे कोल्हापुरातील उद्योग व्यावसायिक, व्यापार्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. यातून बाहेर पडण्यासाठी राज्य शासनाने भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, आनंद माने व सहकार्‍यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. तसेच सध्या सुरू असणार्‍या कोरोना लॉकडाऊनमध्येही सूट देण्याची विनंती केली. यावर पवार यांनी कोल्हापूरचा पॉझिटिव्हिटी रेट अद्याप सहा आहे. तो पाचव्या स्टेजपर्यंत खाली आल्यास व्यापार्‍यांना लॉकडाऊनमध्ये नक्की सूट देता येईल, असे सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे आर. के. पोवार, माजी महापौर निलोफर आजरेकर, राजेश लाटकर, नगरसेवक पूजा नाईकनवरे, विनायक फाळके, प्रकाश मोहिते, अदिल फरास यांच्यासह जिल्हा, महापालिकेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

ओढ्यातील पाणी नियोजनासाठी 10 कोटी

पूर परिस्थितीत ओढ्यातील पाण्याच्या नियोजनासाठी उपाययोजना म्हणून 10 कोटींच्या निधीची आवश्यकता असल्याची माहिती आयुक्त डॉ. बलकवडे यांनी दिली. यावर नियोजन बैठकीत चर्चा करू, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

Back to top button