भुदरगड : अन् अख्खं गावच गेलं शिवारात मुक्कामी ; देवीने कौल दिल्यानंतरच परतणार | पुढारी

भुदरगड : अन् अख्खं गावच गेलं शिवारात मुक्कामी ; देवीने कौल दिल्यानंतरच परतणार

कोनवडे ( ता . भुदरगड ) : राम देसाई
भुदरगड तालुक्यातील टिक्केवाडी हे निसर्ग संपन्नतेने नटलेलं गाव. पुर्वापार चालत आलेली गुळं काढण्याची परंपरा आजच्या युगातही गावकऱ्यांनी आत्मीयतेने , श्रद्धेने जोपासली आहे. देवीचा कौल घेतल्यानंतरच मंगळवारी ( दि .१५ ) गावकऱ्यांनी परंपरेनुसार जंगलात, शिवारात वास्तव करीत, गुळं काढायला सुरूवात केली. गुळं काढाण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर, देवीचा कौल घेतल्यानंतरच गावकरी पुन्हा गावात परततात. ही परंपरा जरी जुणी असली तरी, यादरम्यान येथील ग्रामस्थांना कामासोबतच निसर्ग आनंदाची पर्वणी देखील या शिवारच्या मुक्कामात लाभते.

भुदरगड तालुक्यातील प्रसिद्ध देवालयापैकी एक असणारे टिक्केवाडी येथील जागृत देवस्थान म्हणजे अष्टभुजाई देवी होय. येथील लोकसंख्या अडीच ते तीन हजाराच्या आसपास असून, येथील तहसिलदार, तलाठी, शिक्षक, इंजिनिअर तसेच मोठ-मोठ्या शहरांत शेकडो तरुण खासगी नोकरीत कार्यरत आहेत . गावात घरटी एक व्यक्ती पदवीधर असून, सध्या सुशिक्षितांचे गाव म्हणूनही या गावाची ओळख आहे.

टिक्केवाडी गावात आजही अष्टभुजाई देवीच्या श्रध्देपोटी माघ पोर्णिमेनंतर, दर तीन वर्षानी ‘गुळं काढण्याची’ प्रथा पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे. साधारणतः दहा ते पंधरा दिवस ग्रामस्थ शिवारातच मुक्काम करतात. या प्रथेला जिल्ह्यात अन्य काही ठिकाणी ‘गाव पळन’ असेही म्हणतात. भुजाई देवी धनगरी अवतारात असल्याने, देवीने तीन वर्षांतून एकदा कौल दिल्यानंतर येथील ग्रामस्थ प्रथेनुसार घर -दार सोडून जंगलात, शिवारात वास्तव्य करतात. या काळात दैनंदिन गरजेसाठी लागणारे साहित्य सोबत घेऊन, ग्रामस्थ उर्वरित साहित्य , घर – दार आहे तिथेच ठेऊन रिकामे घराबाहेर पडतात. या प्रथेबाबत दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत. यानुसार ग्रामस्थ ही परंपरा आजही तितक्याच उत्साहाने आजही जपत आहेत.

मुलीचे लग्न…देवीने कौल दिल्यानंतरच

या गावात मुलीचे लग्न ठरवायचे असेल तरी देखील अष्टभुजाई देवीच्या कौलाला विशेष महत्त्‍व आहे.आजही येथे कौल दिल्यानंतरच लग्न ठरवले जाते, असे येथील पोलीस पाटील नेताजी गुरव  व ग्रामपंचायत सदस्य संतोष कांबळे यांनी सांगितले.

सलोखा व सांस्कृतिक दर्शन देखील…

या गुळं काढण्याच्या प्रथेनुसार घरात चुल पेटवणे , घरात झाडलोट करणे , जेवण बनवणे वर्ज्य मानले जाते. सर्व ग्रामस्थ जंगलात , शिवारात गेल्यानंतर आपल्या सोईनुसार ५० ते ६० कुंटुब एकत्र येत पाल उभा करून वास्तव्य करतात. या काळात एकत्रीत जेवण करून निसर्गाचा आनंद लुटण्याबरोबर या काळात, एकत्रीत किर्तन, भजन , व्याख्यान ,गाणी आदीचे आयोजन करतात. दरम्यान, यातून जातीपातीचे बंधने जुगारून , सलोखा , संस्कृती ,आपुलकी निर्माण होण्यास मदत मिळते. या सलोख्यामुळे चांगल्या वाईट गोष्टीची जाण निर्माण होते .

हेही वाचलंत का ?

Back to top button