बालविवाह सिद्ध झाल्यास सरपंच, ग्रामसेवकांवर गुन्हे | पुढारी

बालविवाह सिद्ध झाल्यास सरपंच, ग्रामसेवकांवर गुन्हे

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : बालविवाह रोखण्यासाठी स्थानिक स्तरावर जबाबदार्‍या निश्चित करण्यात येत आहेत. बालविवाहांच्या घटना सिद्ध झाल्यास सरपंच, ग्रामसेवक, पोलिसपाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. तसा प्रस्ताव सरकारकडे सादर करण्यात आल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी शनिवारी दिली.

चाकणकर यांनी पोलिस मुख्यालयात महिलाविषयक गुन्ह्यांच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. यावेळी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलिस अधीक्षक तिरूपती काकडे, उपअधीक्षक प्रिया पाटील, संजय गोर्ले, श्रद्धा आंबले, शिल्पा पाटील उपस्थित होते.

कोरोना काळात महिला अत्याचार व बालविवाहांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले आहे. सोलापुरात बालविवाहाच्या 105 घटना रोखण्यात पोलिसांना यश आले. कोल्हापूर जिल्ह्यातही चार घटना घडल्या असल्या, तरी पोलिसांनी दोषींवर कारवाईचा बडगा उगारल्याचे चाकणकर यांनी सांगितले.

अलीकडच्या काळात बालविवाह घटनांमध्ये वाढ झाली आहे. महिला आयोगाने दखल घेत समाजकंटकांवरील कारवाईसाठी कठोर भूमिका घेतली आहे. गावात प्रमुख मंडळींनी जनजागृती करणे आवश्यक आहे.

कोल्हापूर पोलिसांची प्रभावी काममिरी

महिलाविषयक गुन्ह्यांचा छडा लावून समाजकंटकांवरील कारवाईत कोल्हापूर पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

Back to top button