सिंधुदुर्गच्या समुद्रात कोल्हापूरच्या गुरूप्रसादचा ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ ! सिंधुदुर्ग ते विजयदुर्ग सलग पोहून पार | पुढारी

सिंधुदुर्गच्या समुद्रात कोल्हापूरच्या गुरूप्रसादचा ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ ! सिंधुदुर्ग ते विजयदुर्ग सलग पोहून पार

विजयदुर्ग; सचिन लळीत : कोल्हापूरच्या गुरूप्रसाद मोरे या शाळकरी मुलाने सिंधुदुर्ग समुद्रात बुधवारी रात्री आणि गुरूवारी पहाटेपासून दुपारपर्यंत पोहण्याचा थरार केला. 19 तास 23 मिनिटात न थांबता पोहून त्याने सिंधुदुर्ग किल्ला ते विजयदुर्ग किल्ला हे 97 कि.मी.चे अंतर पार केले. त्याच्या या विक्रमाची नोंद परफेक्ट बुक ऑफ वर्ल्डमध्ये करण्यात आली आहे. बुधवारी रात्री 9 वा. सिंधुदुर्ग किल्ल्यावरून त्याने समुद्रात उडी घेतली आणि तो विजयदुर्ग किल्ल्यावरील विजयदुर्ग जेटी येथे दुपारी 1 वा. पोहोचला. यावेळी विजयदुर्ग किल्ल्याजवळ सिंधुदुर्गातील स्थानिक लोकांनी आणि गुरूप्रसाद मोरे याच्या सहकार्‍यांनी एकच जल्लोष केला.

प्रत्यक्षात सिंधुदुर्ग किल्ला ते विजयदुर्ग किल्ला हे समुद्रमार्गे अंतर 80 कि.मी. आहे. मात्र जीपीएस प्रणालीचा वापर केल्यामुळे व काही ठिकाणी अडथळे आल्यामुळे मार्ग काहीवेळा बदलावे लागले. त्यामुळे हा प्रवास 97 कि.मी. लांबीचा झाला. गुरूप्रसाद मोरे हा कोल्हापूर शहरातील दाभोळकर कॉर्नर येथे राहतो. कोल्हापूर येथीलच छत्रपती शाहू विद्यालयात तो आठवीमध्ये शिक्षण घेत आहे. कोल्हापूरमधील जलतरण संघटनेचे अजय पाठक यांनी आपल्या सहकार्‍यांसमवेत विजयदुर्ग येथे यापूर्वी 5 कि.मी. जलतरण स्पर्धा आयोजित केली होती. त्यानंतर 30 कि.मी. लांबीची जलतरण स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत गुरूप्रसाद मोरेयाने तिसरा क्रमांक पटकावून मोठे यश मिळवले होते. याचवेळी त्याने सिंधुदुर्ग किल्ला ते विजयदुर्ग किल्ला हे अंतर समुद्रातून पोहून कापण्याचा मानस व्यक्त केला होता.

महाराष्ट्राच्या इतिहासाची साक्ष देणारे हे दोन्ही किल्ले पोहून गुरूप्रसादने सर करायचे ठरवले होते. त्यासाठी संपूर्ण तयारीनिशी गुरूप्रसाद बुधवारी सायंकाळी सिंधुदुर्ग किल्ल्यावर पोहोचला. देवगड सभापती रवी पाळेकर यांच्यासह त्यासाठी कोच निलकंठ आखाडे, शिवतेज पवार, हर्षवर्धन मोहिते, योगेश जेलवडे, अथर्व माळी, ओंकार म्हाकवे हे सर्व सहकारी सोबत होतेच. त्याशिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन वाढावे म्हणून अर्थक परीश्रम घेणारे राजू परूळेकर, देवगडचे सभापती रवी पाळेकर, सुप्रीया आळवे,संदिप डोळकर, शरद डोंगरे, रवीकांत राणे, गणेश दळवी, विष्णू सारंग या सर्वांनी त्यांना मदत केली. आवश्यक ती बोट व इतर साहित्य पुरविले होतेच.

गुरूप्रसादने सिंधुदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीवरून बुधवारी रात्री 9 वा. मालवणच्या समुद्रात उडी घेतली. तिथून त्याचा विजयदुर्गच्या दिशेने पोहत प्रवास सुरू झाला. रात्रीची वेळ होती, त्यामुळे अंधार होता. समुद्रकिनार्‍यापासून आठ ते दहा कि.मी. आतमध्ये समुद्रात त्याने प्रवास केला. वाटेत त्याला अधून मधून मोठे खडक आडवे येत होते. त्याच्या सोबत बोटीवरून त्याचे सर्व कोच आणि इतर सहकारी प्रवास करत होते, त्याला सातत्याने प्रेरणा देत होते. गुरूप्रसाद धाडसाने मार्गक्रमण करत होता. विषारी असलेल्या जेलफिशचा त्रास या दरम्यान गुरूप्रसादला होत होता. त्यापासून बचाव करण्यासाठी लाल ग्रीस अंगाला लावण्यात आले होते. दोन तासाचा प्रवास झाल्यानंतर रात्री 11 वाजता त्याच्या सोबत अधून मधून काही सहकारी पोहून त्याला धाडस देत होते. मालवण किनारा तिथून पुढे तोंडवळी बीच, तिथून पुढे आचरा, आडबंदर बीच, मोर्वे बीच, तांबळडेग बीच, कुणकेश्वर बीच करत देवगड समुद्रातून विजयदुर्ग किनार्‍यावर गुरूप्रसाद गुरूवारी दुपारी 4.23 वा. पोहोचला.

बुधवारी रात्री निघण्यापूर्वी 7 वा. त्याने जेवण केले होते. त्यानंतर त्याने पथ्य पाळले होते. गुरूवारी दुपारी 1 वा. तो पोहोचला तेव्हा देवगड सभापती रवी पाळेकर, विजयदुर्ग सरपंच प्रसाद देवधर, उपसरपंच महेश बीडये, राजू परूळेकर व इतरांनी उपस्थित राहून त्याचे जोरदार स्वागत केले. विजयदुर्ग पंचक्रोशीतील ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुरूप्रसादचे प्रत्येकजण कौतुक करत होता. तो खुपच दमला होता. त्यामुळे विजयदुर्ग येथे पोहोचताच त्याने काही काळ विश्रांती घेतली.

महाराष्ट्र राज्य होसी जलतरण संघटनेच्या मान्यतेने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विजयदुर्ग येथे गुरूप्रसाद मोरे याचे वडील विनोद मोरे व आई या पालकांचे सर्व ग्रामस्थ तसेच माजी सरपंच प्रदिप मिठबावकर यांनी सत्कार केला व आर्शिवाद घेतला. यावेळी विजयदुर्ग येथे आलेले सह्याद्री प्रतिष्ठान येथील शिवभक्त यांनी गुरूप्रसाद याला महाराजांची मुद्रा देऊन त्याचा गौरव केला. विजयदुर्ग येथे अनेकांनी गुरूप्रसाद याला भेटून त्याचे स्वागत केले.

 

Back to top button