कोल्हापूर विमानतळाचे चार महिन्यांत भूसंपादन | पुढारी

कोल्हापूर विमानतळाचे चार महिन्यांत भूसंपादन

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील विमानसेवांच्या कालबद्ध विकासासाठी राज्य शासनाकडून 600 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होईल. कोल्हापूर विमानतळासाठी अतिरिक्‍त 64 एकर जागेचे भूसंपादन चार महिन्यांत पूर्ण केले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक निधी मंजूर केला जाईल, असे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसी) व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी सोमवारी सांगितले.

राज्यातील विमानतळांचा विकास व नवीन सेवा यांबाबत ‘महाराष्ट्र चेंबर’चे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासमवेत मुंबईत झालेल्या बैठकीत कपूर यांनी ही माहिती दिली. गांधी यांच्या हस्ते कपूर यांचा सत्कार करण्यात आला.

कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्र येथील शेतमालाला प्रोत्साहन मिळण्यासाठी जिल्हास्तरीय मालवाहतूक विमानसेवा सुरू करावी. कोल्हापूर विमानतळाचे विस्तारीकरण वेगाने पूर्ण करावे. जळगाव विमानतळावरून विमान सेवा वाढवून मालवाहतूक सेवा सुरू करावी, नाशिक विमानतळावरील सुविधा वाढवा याचा अभ्यास अहवालही गांधी यांनी सादर केला.

विमानतळांच्या विकासासाठी ‘महाराष्ट्र चेंबर’ची सिव्हिल एव्हिएशन समिती संपूर्ण सहकार्य देईल. वेगाने वाढणार्‍या प्रवासी व माल वाहतुकीकरिता जिल्हास्तरावर ‘एमएडीसी’ व ‘महाराष्ट्र चेंबर’च्या वतीने प्रशिक्षण केंद्र उभारले जाईल. त्याद्वारे युवकांना विमानसेवेशी निगडित रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील, असे गांधी म्हणाले.

राज्यातील जिल्ह्यांना शहरासाठी जोडण्यासाठी नवीन हवाई मार्ग व विमानसेवा सुरू करण्याची सूचना वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दशरथी यांनी केली. चेंबरच्या सिव्हिल एव्हिएशन समितीचे सुनीत कोठारी यांनी विमान सेवा पुरवणार्‍या कंपनांच्या इंधनावरील व्हॅट 1 टक्के करावा अशी सूचना केली.

नोव्हेंबर 2022 ला अमरावती विमानतळावरून प्रवासी सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. तेथे राज्य सरकार अतिरिक्‍त निधी देणार आहे. शिर्डी येथे कार्गो टर्मिनस उभारण्यात येणार असून राज्य शासन आणि शिर्डी संस्थान यांच्याकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. पुणे-शिर्डी-नागपूर अशी सेवा 18 फेब—ुवारीपासून सुरू होणार आहे. पुणे-औरंगाबाद-नागपूर अशीही विमानसेवा सुरू होणार आहे. विमानसेवा विस्तारीकरणासाठी सर्व विमान कंपनी व चेंबर ऑफ कॉमर्सची येत्या महिन्यात बैठक घेतली जाईल, असेही कपूर यांनी स्पष्ट केले. रत्नागिरी विमानतळाच्या कामाला प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी चेंबरचे उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, सौ. शुभांगी तिरोडकर, रवींद्र माणगावे, सुधाकर देशमुख, चंद्रशेखर पुनाळेकर, सुनीत कोठारी, प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे उपस्थित होते.

Back to top button