हातकणंगले तालुका क्रीडा संकुलाचे ‘श्रेयवादात’ लचके..! | पुढारी

हातकणंगले तालुका क्रीडा संकुलाचे ‘श्रेयवादात’ लचके..!

इचलकरंजी ; विठ्ठल बिरंजे : हातकणंगले तालुक्यासाठी मंजूर असलेल्या क्रीडा संकुलचे आजी माजी लोकप्रतिनिधींच्या श्रेयवादत अक्षरश: लचके तोडले जात आहेत. माजी मंत्री जयवंतराव आवळे यांनी प्रचंड इर्षा आणि मोठ्या संघर्षातून क्रीडा संकुल मंजूर केले. मात्रा जागा बदलण्याच्या वादात १७ वर्षापासून प्रश्न भिजत ठेवला आहे. निदान त्यांचे पुत्र आमदार ‘राजूबाबा’ तरी वडीलांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करतात काय याकडे क्रीडा प्रेमींचे लक्ष लागले आहे.

ग्रामीण भागातील खेळाडुंना प्रोत्साहन देण्यासाठी २००४ साली तत्कालीन काँग्रेस सरकारने तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय घेतला. तत्कालीन आमदार जयवंतराव आवळे यांनी शासनाला तातडीने प्रस्ताव दिला. प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असतानाच तालुक्याचे दुसरे आमदार प्रकाश आवाडे यांनीही क्रीडासंकुल इचलकरंजी मतदारसंघात नेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. क्रीडा संकुलच्या ठिकाणावरुन या दोन आमदारांमधील संघर्ष तालुक्यातील जनतेने पाहिला. मात्र काँग्रेस पक्षात असलेल्या मानसन्मानामुळे जयवंतराव आवळे यांची सरशी झाली.

मात्र शासनाने इचलकरंजी मतदारसंघात दुसरे क्रीडा संकुल मंजूर करून आवाडे यांचे समाधान केले. हातकणंगलेतील क्रीडा संकुलासाठी ग्रामीण रुग्णालयाशेजारी जागाही निश्चित केली होती. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच विधानसभा निवडणुकीत जयवंतराव आवळे यांचा राजीव आवळे यांनी पराभव केला.

नूतन आमदारांनी क्रीडा संकुलात लक्ष घालून पहिल्यांदा जागा बदलण्याचे प्रयत्न केले. लक्ष्मी औद्योगिक वसाहतीशेजारी नवी जागा निश्चित केली. यासाठी समितीही स्थापन केली. यासाठी तब्बल पाच वर्षांचा कालावधी गेला. दरम्यानच्या काळात झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचाही पराभव झाला आणि डॉ.मिणचेकर विजयी झाले. त्यांनी क्रीडा संकुलाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला.  क्रीडा संकुल अन्य ठिकाणी हलवण्याचे प्रयत्न केले.  मात्र त्यांना फारसे यश आले नाही. तब्बल दहा वर्षे ते आमदार असतानाही क्रीडा संकुलाला मुहूर्त मिळालेला नाही.

हातकणंगले तालुक्याच्या विभाजनाचा विषय ऐरणीवर

दरम्यानच्या काळात हातकणंगले तालुक्याच्या विभाजनाचा विषय ऐरणीवर आला आणि क्रीडा संकुलासाठी पेठवडगाव परिसरातून मागणी होवू लागली. यासाठी काही लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला. अशाप्रकारे क्रीडा संकुलाचा विषय पुढे आला की आजी-माजी लोकप्रतिनिधींकडून त्या-त्या परिस्थितीत जागेच्या कारणावरून क्रीडा संकुलाचे लचके तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तब्बल १७ वर्षानंतरही मिळालेला एक कोटींचा निधी पडून आहे. त्यामुळे सध्याचे विद्यमान आमदार राजूबाबा आवळे हे याबाबत काय भूमिका घेतात, याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागलेले आहे.

चार आमदार आणि तीन खासदारांची कारकिर्द उलटून गेली असली तरीही तालुकास्तरीय क्रिडा संकुलाचा खेळखंडोबा  सुरूच आहे. निधी मंजूर असतानाही केवळ लोकप्रतिनिधिंची उदासिनता आणि श्रेयवादात क्रिडा संकुल अडकले असून त्याचा फटका मात्र तालुक्यांतील खेळाडूंना सोसावा लागत आहे. रखडलेल्या क्रिडा संकुलाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी क्रीडाप्रेमींतून होत आहे.
क्रीडामंत्री सुनिल केदार यांना साकडे

हातकणंगले क्रीडा संकुलाबाबत सामाजिक कार्यकर्ते सागर पुजारी यांनी थेट क्रीडा मंत्री सुनिल केदार यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला असून क्रीडा संकुल हातकणंगलेतच झाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावर मंत्री केदार यांनी प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत.

Back to top button