कोल्हापूर : प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तरुणीची गळफासाने आत्महत्या - पुढारी

कोल्हापूर : प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तरुणीची गळफासाने आत्महत्या

मलकापूर : पुढारी वृत्तसेवा

कांडवण (ता. शाहूवाडी) येथील 21 वर्षीय तरुणीने अमोल संजय सुतार या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. याप्रकरणी तरुणीच्या आईच्या फिर्यादीवरून अमोल सुतारला शाहूवाडी पोलिसांनी अटक केली असून, त्याला न्यायालयाने शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी : संशयित अमोल सुतार हा कांडवण (ता. शाहूवाडी) येथील रहिवासी आहे. फिर्यादी महिलेची 21 वर्षीय मुलगी आणि अमोल सुतार यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे कुटुंबीयांना काही दिवसांपूर्वी समजले होते.

घरच्यांनी समजावल्यानंतर तरुणीने हे प्रेमसंबंध संपुष्टात आणले होते. मात्र, अमोलने प्रेमसंबंध कायम ठेवण्याचा तिच्यामागे तगादा लावला होता. तरुणीच्या मोबाईलवर संदेश पाठवून, ‘तू माझ्याशी लग्न कर, नाही तर मी जीव देईन,’ असे वारंवार धमकावून अमोल सुतार तरुणीस मानसिक त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून तरुणीने राहत्या घरातील बडोद्याला गळफास लावून मंगळवारी आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या आईने गुरुवारी रात्री शाहूवाडी पोलिसांत दिली.

पोलिसांनी संशयित तरुण अमोल सुतारविरुद्ध 306, 506 कलमांन्वये गुन्हा नोंद केला आहे. सुतारला शाहूवाडी-मलकापूर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एच. आर. पाटील यांच्यासमोर उभे केले असता त्यास शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. अधिक तपास सपोनि शैलजा पाटील करीत आहेत.

Back to top button