कोल्हापूर : सीपीआरमधील डॉक्टर गगनबावड्यात करतात काय? - पुढारी

कोल्हापूर : सीपीआरमधील डॉक्टर गगनबावड्यात करतात काय?

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे प्रतिनियुक्तीवर पाठवलेले काही डॉक्टर घाट माथ्यावर थांबून परिस्थितीचा आढावा घेतात. प्रत्यक्ष जागेवर जाण्यापेक्षा त्यांना गगनबावडा घाट माथ्यावर थांबण्यातच आनंद वाटू लागला आहे. नयनरम्य निसर्गाचा आनंद घेऊन ही मंडळी रात्री पुन्हा कोल्हापूरच्या दिशेने मार्गस्थ होतात. गेल्या काही महिन्यांपासून त्यांचा हा गुपित खेळ सुरू आहे; पण काही डॉक्टरांनी चक्क सिंधुदुर्ग येथेच मुक्काम ठोकलाय. जोपर्यंत कार्यमुक्तचे पत्र मिळत नाही, तोपर्यंत ते सिंधुदुर्ग सोडत नाहीत.

सिंधुदुर्ग येथे होणार्‍या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापन प्रक्रियेसाठी वैद्यकीय शिक्षण पूरक सुविधांची पाहणी इंडियन मेडिकल कौन्सिलकडून सुरू आहे. त्यासाठी कोकणातील नियोजित वैद्यकीय महाविद्यालयात पुरेशा संख्येने पूर्ण वेळ आणि पूर्ण क्षमतेने डॉक्टर आहेत, हे दाखविण्यासाठी सीपीआरसह राज्यातील अन्य शासकीय वैद्यकीय महाविद्यायातील डॉक्टरांनाही येथे प्रतिनियुक्तीवर पाठविले जाते; पण सिंधुदुर्गपासून सीपीआरचे अंतर जवळ असल्याने प्राधान्याने येथील 32 डॉक्टरांना प्रतिनियुक्तीवर पाठविले आहे.

सीपीआरमधील डॉक्टरांना प्रतिनियुक्तीवर पाठविल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून येथील वैद्यकीय सेवा विस्कळीत झाली आहे. अनेक रुग्णांच्या विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. उपलब्ध डॉक्टरांनी प्राथमिक उपचार आणि तातडीच्या शस्त्रक्रियांवर प्राधान्याने केल्या. कोरोना संसर्ग वाढल्यामुळे सीपीआरमधील डॉक्टरांवर वैद्यकीय सेवेचा ताण वाढला आहे, तरी देखील त्यांची अखंड सेवा सुरू आहे. अनेक डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. उपचार घेऊन पुन्हा ते वैद्यकीय सेवेत आहेत.

सिंधुदुर्ग येथे प्रतिनियुक्तीवर पाठवलेल्या डॉक्टरांना कधी कार्यमुक्त केले जाईल आणि कधी बोलावणे येईल, हे सांगणे कठणीच. सीपीआरमधील काही डॉक्टरांचे ‘खासगीत’ प्रॅक्टिस सुरू आहे. त्यामुळे त्यांना सिंधुदुर्ग प्रतिनियुक्ती नको. प्रतिनियुक्तीचा आदेश आला की, त्यांच्या कपाळावर आठ्या पडतात. मग काय, कागदी घोडे नाचवून सगळेच शाबूत. प्रतिनियुक्तीचा आदेश आला की, काही डॉक्टर सिंधुदुर्गात, तर काही डॉक्टर गगनबावड्याच्या घाटमाथ्यावर हा गुपित खेळ काही महिन्यापासून सुरू आहे.

Back to top button