‘दख्खनच्या राजा’चा लई मोठा थाट; पण जोतिबाच्या भेटीला इवलीशी वाट! - पुढारी

‘दख्खनच्या राजा’चा लई मोठा थाट; पण जोतिबाच्या भेटीला इवलीशी वाट!

कोल्हापूर : सुनील सकटे

दख्खनचा राजा जोतिबा हे महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गोव्यातील लक्षावधी भाविकांचे कुलदैवत आहे. जोतिबाच्या कुळाचा विस्तार असा भला मोठा असला तरी जोतिबाच्या भेटीला जाण्यासाठीची वाट अत्यंत तोकडी आहे. दख्खनच्या राजाला ती किमान साजेशी असावी, ही लाखो कुळांची अन् कोट्यवधी भाविकांची अपेक्षाही रास्तच आहे.

जोतिबा देवस्थानकडे जाणारा रस्ता अरुंद असल्यानेच धोकादायक आहे. मूळ रस्ता खचल्याने गायमुखमार्गे रस्ता काढण्यात आला खरा; पण तोही तोकडाच आहे. तो दुहेरी करणे आवश्यक आहे. पाण्याचा टाका नावाने ओळखल्या जाणार्‍या परिसरात केर्लीमार्गे प्रमुख रस्ता खचलेला आहे. विशेष म्हणजे हा रस्ता दर चार-पाच वर्षांनी एकदा नित्यनेमाने खचत आलेला आहे.

या ठिकाणच्या खडकांची भौगोलिक रचनाच अशी आहे की, रस्ता कायमस्वरूपी सुस्थितीत राहणे अवघड आहे, असे बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. कातळ खडक लागेपर्यंत खोदकाम करून रस्ता उचलून घ्यायचा झाल्यास 200 ते 300 फूट खोदकाम करावे लागेल आणि ही बाब अशक्यप्राय आहे, असे हताश उद्गार काढून हे तज्ज्ञ कानावर हात ठेवतात.

तज्ज्ञांचे मत लक्षात घेता हा रस्ता तूर्त फक्त दुचाकींसाठी खुला करावा आणि त्याचा निर्णय लागेपर्यंत गायमुखमार्गे जाणार्‍या रस्त्याचे रुंदीकरण करावे. हा रस्ताही पुढे काही अंतरावर खराब झालेला आहे. डांबर निघून गेले आहे. इतस्तत: खडी विखुरलेली आहे. प्रसंगी वाहने घसरतात, टायर पंक्चर होते.

मुख्य रस्ता खचल्याने पर्यायी मार्गावरून वाहतूक वाढली आहे. वाहतुकीला रस्ता अपुरा पडतो आहे. सहा कि.मी.च्या घाटमार्गातील विविध ठिकाणच्या धोकादायक वळणांमुळे ही ठिकाणे अपघातप्रवण स्थळे बनली आहेत. धोकादायक वळणे काढून रस्ता जास्तीत जास्त सरळ करणेही अशक्य नाही. जोतिबा दर्शनानंतर अनेक पर्यटक पन्हाळ्याला जाणे पसंत करतात; मात्र इथून गडावर जाण्यासाठीचा रस्ताच बंद आहे. ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीत पन्हाळा प्रवेशद्वाराजवळच रस्ता खचला होता. तेव्हापासून ही स्थिती आहे. सध्या दुरुस्तीचे काम सुरू आहे.

Back to top button