अंबाबाई मंदिर परिसरात भाविकांत तुंबळ हाणामारी | पुढारी

अंबाबाई मंदिर परिसरात भाविकांत तुंबळ हाणामारी

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनाकरिता ई-पाससाठी रांगेत उभारण्यावरून भाविकांच्या दोन गटांत फ्री स्टाईल तुंबळ हाणामारी झाली. एकमेकांवर चप्पल व खुर्च्याही फेकण्यात आल्या. मंगळवारी सकाळी जुना राजवाडा परिसरातील दर्शन रांगेत हा प्रकार घडला. यामुळे देवस्थान समितीचे कर्मचारी, सुरक्षा रक्षकांची एकच तारांबळ उडाली.

मंगळवारी सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास जालना येथील दोन एस.टी. बसमधून सुमारे शंभर भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी दर्शन रांगेजवळ आले. येथे देवस्थान समितीच्या मोफत ई-पास केंद्रासमोर रांगेत उभारण्यावरून भाविकांच्या दोन गटांत वाद सुरू झाला. तो वाढत गेल्यामुळे प्रकरण हातघाईवर आले. यानंतर थेट हाणामारीच सुरू झाली.

महिलाही हाणामारीत मागे नव्हत्या. चप्पल आणि खुर्च्या एकमेकांना फेकून मारण्यात आल्या. देवस्थानचे कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी हस्तक्षेप करून हाणामारी करणार्‍यांना रोखले. त्यांना जुना राजवाडा पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

Back to top button